सांगली : वरुणराजाच्या उपस्थितीत आटपाडीत ‘युवा महोत्सवा’चा शुभारंभ

सांगली : वरुणराजाच्या उपस्थितीत आटपाडीत ‘युवा महोत्सवा’चा शुभारंभ

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयावर शिवाजी विद्यापीठाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत मध्यवर्ती युवा महोत्सव यशस्वी करू, अशी ग्वाही आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमरसिंह देशमुख यांनी दिली. आटपाडी येथे श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४२ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ संचालक प्रा.डॉ.आर. व्ही गुरव, संस्थेचे सचिव एच. यु पवार, निरीक्षक अशोक चौगुले, प्राचार्य डॉ. विजय लोंढे, निलेश डामसे, डॉ.विनोद ठाकूर देसाई, पी.एम.माने, सुमनताई नागणे, प्राचार्या योजना जोगळेकर, प्राचार्या विजया चव्हाण, मुख्याध्यापक प्रकाश नामदास, डॉ.दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आणि संयोजकांचा सळसळता उत्साह आणि सहभाग आम्हालाही ऊर्जा देतो. विद्यापीठाचे पुस्तकी शिक्षणाबाहेरील ज्ञान आणि कलागुणांना वाव देणारे नवीन उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. तीन दिवसांचा हा महोत्सव सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करू.

डॉ.आर. व्ही. गुरव म्हणाले की, देशमुख विद्यालयाने जिल्हा महोत्सवाचे योग्य आयोजन केले होते. त्यामुळे जिल्ह्यात मध्यवर्ती युवा महोत्सव घेण्याचे निश्चित झाल्यावर प्रथम देशमुख विद्यालयाचे नाव नजरेसमोर आले. हा महोत्सव देखील महाविद्यालय यशस्वी करेल, अशी अपेक्षा आहे.

कोरोना काळात ऑनलाईन महोत्सव झाले. त्यानंतरच्या मध्यवर्ती युवा महोत्सवात विद्यार्थांचा सहभाग वाढला आहे. ३२ कलाप्रकारात ३००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दमदार पावसाने आज हजेरी लावली असली तरी कोणतीही अडचण आली. तरी हा युवा महोत्सव जोरदारपणे होणार आहे.

स्वागत, प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. विजय लोंढे यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्रारंभी स्व. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. प्रा. विजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दत्तात्रय जाधव यांनी आभार मानले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news