

विटा : विटा शहरात विरोधी पक्षाचे चार नगरसेवक आहेत. शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, पण या त्यांनी स्वतःच्या प्रभागातील मूलभूत प्रश्नांकडे ही लक्ष देणे आवश्यक आहे, असा उपरोधिक टोला काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते मनोज देवकर यांनी लगावला आहे.
मनोज देवकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, विटा शहरातील नवीन आणि जुने शिवाजीनगर परिसरात विटा-कराड ते विटा-पुसेसावळी रस्त्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. या रस्त्यावरून दररोज अनेक रहिवाशी नागरिक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत आहेत. मात्र, या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता तेथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पावसाळ्यातहा रस्ता अधिकच खराब स्थितीत असतो, तर इतर वेळीही खड्डे आणि खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. या परिसरातील लोकांना चांगला आणि सुरक्षित रस्ता मिळणे हक्काचे आहे. विशेष म्हणजे, याच रस्त्यावर विरोधी पक्षातील दोन नगरसेवकांची घरे आहेत. माजी ज्येष्ठ नगरसेवकांची घरेही याच परिसरात आहेत. एवढेच नव्हे, तर सत्ताधारी गटातील काही प्रमुख कारभारीही याच भागात वास्तव्यास आहेत.
परिसरातील लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचे वास्तव्य आहे. असे असतानाही या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित राहणे ही आश्चर्याची बाब आहे. या दोन्ही नगरसेवकांशी आमचे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जुने सहकारी संबंध आहेत. राजकीय अपरिहार्यतेतून त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागील त्यांची राजकीय अडचण आम्ही समजू शकतो. त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत आमचा कोणताही व्यक्तिगत आक्षेप नाही. मात्र, राजकारण आणि विकासाचे प्रश्न या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.
पक्षीय भूमिका कोणतीही असली, तरी आपल्या भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी लोकप्रतिनिधींनी पक्षभेद बाजूला ठेवून प्रयत्न करणे अपेक्षित आहे. शहरातील इतर प्रश्नांवर आवाज उठवताना आपल्या प्रभागातील रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांच्या प्रश्नांवरही त्यांनी ठाम भूमिका घ्यावी. केवळ विरोधी पक्षातील नगरसेवक म्हणून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा आपल्या भागातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी गटाकडेही आग्रह धरला पाहिजे. लोकप्रतिनिधींचे खरे काम हे नागरिकांच्या अडचणी सोडविणे आणि आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास घडवून आणणे हेच आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे.
संबंधित नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी तसेच सत्ताधारी गटातील पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नासाठी एकत्रित प्रयत्न करावेत आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करावा. शहराच्या विकासावर बोलण्याचा अधिकार प्रत्येक लोकप्रतिनिधीला आहे. दौंड - संकेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबद्दलविरोधी नगरसेवकांनी आवाज उठवलाच पाहिजे. परंतु आपल्या स्वतःच्या प्रभागातील रस्ता आणि परिसरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडेही लक्ष दिले पाहिजे, असेही मनोज देवकर यांनी म्हटले आहे.