Rangbhumi Din| मिरजेत रंगभूमी दिन कार्यक्रमाला मनपा अधिकारी, पदाधिकाऱ्यांची पाठ

रंगकर्मींच्या सन्मान सोहळ्याचे निमंत्रण देऊनही अनुपस्थिती
Experimental Plays
मिरजेत रंगभूमी दिन कार्यक्रमाला मनपा अधिकारी, पदाधिकाऱ्यांची पाठPudhari
Published on: 
Updated on: 

मिरज : मराठी रंगभूमी दिनानिमित्त सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका व सर्व रंगकर्मी परिवाराच्यावतीने गुरुवारी (दि. ५) मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मिरजेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाकडे महापौर, उपमहापौर, महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी आणि प्रमुख पाहुण्यांनी पाठ फिरविल्याने रंगकर्मी आणि उपस्थितांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.

नटसम्राट बालगंधर्व यांनी ज्या नाट्यगृहामध्ये पहिल्यांदा नाटक सादर केले, त्या मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये आज मराठी रंगभूमी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर महापौर धीरज सूर्यवंशी, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची नावे होती. सकाळी रंगभूमी पूजन, नटराज पूजन, कलाकारांच्या वतीने नांदी, गणनृत्य, शास्त्रीय नृत्य, रंगभूमी सेवा करणाऱ्या रंगकर्मींचा सत्कार, पुस्तक प्रकाशन, शाहिरीचे सादरीकरण आणि नाट्य अभिवाचन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, रंगभूमीच्या जतन आणि संवर्धनासाठी आयुष्य वेचणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्याचा हा सोहळा होता. मात्र, ज्या महापालिकेच्या नावाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्याच महापालिकेचे प्रमुख पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.

निमंत्रणपत्रिकेवर प्रमुख पाहुणे म्हणून नावे असतानाही त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. मिरजेला नाट्य, संगीत आणि सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. या परंपरेचे जतन करणाऱ्या रंगकर्मींचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी आणि महापालिका पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, रंगकर्मींच्या सन्मानाच्या व्यासपीठावरच मान्यवरांची अनुपस्थिती खटकणारी ठरली.

एकीकडे सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे त्यासाठी योगदान देणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवायची, हा विरोधाभास आहे. मिरजेत आयोजित कार्यक्रमाला महापालिकेचेच पदाधिकारी उपस्थित नसतील, तर अशा कार्यक्रमांच्या आयोजनामागील गांभीर्य तरी किती, असा सवाल यावेळी रंगकर्मींनी जाहीरपणे केला. मात्र, हे अधिकारी, पदाधिकारी आले नसले तरीही मराठी रंगभूमीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

पत्रिकेवर नाव, उपस्थिती मात्र शून्य!

कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर महानगरपालिका आणि रंगकर्मी यांच्या संयुक्त आयोजनाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा रंगकर्मींना होती. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी महापालिकेचा एकही अधिकारी अथवा पदाधिकारी फिरकला नाही. महापालिकेचे नाव निमंत्रण पत्रिकेवर असताना प्रत्यक्ष उपस्थितीत मात्र महापालिकेची अनुपस्थिती दिसून आल्याने रंगकर्मींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनात सहभागाचा केवळ देखावा करायचा की कलाकारांच्या पाठीशी प्रत्यक्ष उभे राहायचे, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.