

No Confidence Motion Yogewadi Tasgaon
तासगाव : योगेवाडी (ता.तासगाव) ग्रामपंचायतीत अभूतपूर्व राजकीय घडामोड घडली आहे. सरपंच दिपाली राजेश माने यांच्याविरोधात ग्रामपंचायतीच्या सर्वच्या सर्व सात सदस्यांनी एकमताने अविश्वास ठराव मांडण्याची नोटीस दिली आहे.
अविश्वास ठरावावर उपसरपंच विनोद केशव माने, श्रीमंत ईश्वर माने, सुहास उत्तम माने, सीमा पोपट साळुंके, सुनिता सुरेश माने, शोभा भारत चौगुले आणि विद्या दिगंबर पवार या सदस्यांच्या सह्या आहेत. संपूर्ण ग्रामपंचायत सरपंचांच्या विरोधात उभी राहिल्याने योगेवाडीसह तासगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सरपंच दिपाली माने या ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करत आहेत. स्वतःच्या मनमानी निर्णयांवर ग्रामपंचायतीचा कारभार हाकत असल्याचा गंभीर आरोप सदस्यांनी तहसिलदार यांना दिलेल्या नोटीसमध्ये केला आहे.
त्यांच्या कार्यकाळात गावाचा विकास पूर्णतः रखडला असून अपेक्षित मूलभूत सुविधांची कामेही मार्गी लागलेली नाहीत. गावामध्ये सरपंचांविरोधात संपूर्ण नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. पत्नी सरपंच असताना पतीकडून थेट हस्तक्षेप होत असल्याने ग्रामपंचायतीची स्वायत्तता धोक्यात आल्याचा आरोप करत सदस्यांनी या संपुर्ण प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
तसेच गावातील रस्त्यांवर घरासमोर अतिक्रमण झाल्याच्या अनेक तक्रारी असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. वरील सर्वच बाबी ख-या असल्याचे जाहीर करत अविश्वास ठराव आणला आहे. ग्रामपंचायतीच्या सातही सदस्यांनी सरपंचांविरोधात एकत्र येत अविश्वास ठराव आणल्याने योगेवाडी ग्रामपंचायतीतील सत्तासंघर्ष उघडपणे समोर आला आहे.
योगेवाडीच्या सरपंच दिपाली माने यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांकडून अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. सदर ठराव महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार प्राप्त झाला असून त्याची नोंद घेण्यात आलेली आहे. नियमानुसार पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असून, ठरावावर चर्चा व मतदानासाठी निश्चित कालावधीत विशेष सभा घेण्यात येईल. सभेची तारीख, वेळ व स्थळ याबाबत सर्व संबंधित सदस्यांना नियमानुसार लेखी नोटीस देण्यात येणार आहे.
- अतुल पाटोळे, तहसीलदार तासगाव