

उध्दव पाटील : सांगली
प्रभाग क्रमांक 11
सांगली महानगरपालिकेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आली आहे. महापालिकेच्या 78 जागांसाठी तब्बल 381 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्व वीस प्रभागांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. त्यातही काही प्रभागांतील लढती या हाय व्होल्टेज ठरत आहेत. अशा प्रभागांचे एक चित्र...
सांगलीतील प्रभाग क्रमांक 11 हा एक प्रमुख हॉट स्पॉट बनला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू हर्षवर्धन पाटील विरुद्ध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केलेले युवक काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष मनोज सरगर यांच्यातील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये चार जागांसाठी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना, अशी तिरंगी लढत होत आहे. पण एकेकाळचे काँग्रेसी चेहरेच आमने-सामने दिसत आहेत.
या प्रभागात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. शिवसेनेचे तिसरे पॅनेल मैदानात उतरल्याने ही निवडणूक तिरंगी बनली. काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव व खासदार विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील हे 11-ड मधून निवडणूक लढवत आहेत. 11-अ मधून रमेश सर्जे, 11- ब मधून अश्विनी कोळेकर, 11- क मधून अंजली जाधव हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. विरोधी भाजपकडून 11- अ मधून संजय कांबळे (मदनभाऊ पाटील युवा मंचचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व माजी महापौर कांचन कांबळे यांचे दीर), 11- ब मधून सविता रूपनूर, 11- क मधून शुभांगी साळुंखे आणि 11- ड मधून मनोज सरगर, तर शिवसेनेकडून 11- अ मधून भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटे, 11- ब मधून माया लेंगरे (मदनभाऊ पाटील युवा मंचचे माजी जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांच्या पत्नी) आणि 11-क मधून सुप्रिया साळुंखे हे उमेदवार आहेत.
सांगली महापालिकेची स्थापना 1988 मध्ये झाली. 1998 च्या पहिल्या निवडणुकीत इथली प्रभाग रचना एकसदस्यीय होती. काँग्रेसचे दिनेश रेवणकर विजयी झाले होते. महापालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक 2003 मध्ये झाली. तीनसदस्यीय प्रभाग रचनेत काँग्रेसचे उमेश पाटील व विलास सर्जे, तर भाजपच्या नीता केळकर विजयी झाल्या होत्या. 2008 मध्ये पुन्हा एकसदस्यीय रचना झाली आणि जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे शीतल पाटील विजयी ठरले. काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. महापालिकेच्या 2013 च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत झाली. अपक्षांचे पॅनेल विजयी झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी उमेदवारांचा पराभव करून उमेश पाटील यांच्यासह दोन्ही अपक्ष विजयी झाले. 2018 मध्ये चारसदस्यीय प्रभागात काँग्रेस, भाजप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत झाली. काँग्रेसचे सर्व चारही उमेदवार विजयी झाले होते. आता 2026 ची निवडणूक तिरंगी होत आहे.
प्रभाग 11 मधील लढती या केवळ उमेदवारांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. इथल्या लढती पक्षीय प्रतिष्ठेच्याही बनल्या आहेत. काँग्रेसच्या विजयासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉ. विश्वजित कदम रणनीती आखत आहेत, तर भाजपकडून आमदार सुधीर गाडगीळ, जयश्री पाटील यांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यांचे कट्टर समर्थक हे इथे उमेदवार आहेत. हर्षवर्धन पाटील विरुद्ध मनोज सरगर ही लढत संपूर्ण महापालिका क्षेत्रासह जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे. महापालिका निवडणुकीतील हा हाय व्होल्टेज सामना प्रभाग क्रमांक 11 च्या स्थानिक प्रतिनिधित्वाबरोबरच काँग्रेस-भाजपच्या प्रतिष्ठेचा ठरत आहे. निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.