तासगाव : पुढारी वृत्तसेवा : कवठेमहांकाळ शहरातील महांकाली मंदिर परिसरातील पहिल्या मजल्यावरील दुकानगाळे आठ दिवसांत पाडण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. महाकाली मंदिराचे बांधकाम कोल्हापूर आणि तुळजापूर येथील मंदिराच्या प्रमाणे व्हावे, यासाठी गेले काही महिने भाविकांचा लढा सुरु आहे. दुसऱ्यांदा शहर बंदची हाक भाविकांच्या वतीने देण्यात आली होती. बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
शहरातील नागरिकांनी मल्लिकार्जुन मंदिरापासून ते महांकाली मंदिरापर्यंत मोर्चा काढला. पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे परिविक्षाधिन पोलीस उपाधीक्षक संदेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीमध्ये नागरिक व विश्वस्त यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये निर्णय घेण्यात आला. तसेच परिसरात असलेले पहिल्या मजल्यावरील गाळे येत्या आठ दिवसांत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. लेखी पत्र सर्वांच्या उपस्थितीत तयार करण्यात आले.
दरम्यान, बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता मल्लिकार्जुन मंदिरापासून ते महांकाली मंदिरापर्यंत मोर्चा काढला. मोर्चा महांकाली मंदिराजवळ येताच पोलीस उप अधिक्षक संदेश नाईक यांनी हे आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन केले.
शहरातील नागरिकांना बैठकीत कोणता निर्णय झाला आहे याबाबतची माहिती नसल्यामुळे गैरसमज निर्माण झाला. यामुळे नागरिकांनी थोडा वेळ गोंधळ घातला, परंतू शहरातील नागरिक दिलीप पाटील, मिलींद कोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष टी. व्ही. पाटील, पांडुरंग पाटील, नगरसेवक विश्वनाथ पाटील यांनी बैठकीमध्ये झालेला निर्णय नागरिकांना वाचून दाखवला.
पोलीस उपाधीक्षक संदेश नाईक यांनी मंदिरासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत. चांगला निर्णय घेऊन आपण थांबूया, आपल्या मताप्रमाणे निर्णय झालेला आहे. नागरिकांनी शांततेचे सहकार्य करावे. कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. मंदिर तुमच्या मनाप्रमाणे होईल, तसा निर्णय बैठकीमध्ये झालेला आहे, असे आवाहन केले. त्यानंतर महांकाली मंदिरामध्ये भाविकांनी एकत्रित येत महाआरती करून आंदोलनाची सांगता केली.
यावेळी मिलिंद कोरे, विकास सोसायटी चेअरमन दिलीप झुरे, उदय शिंदे, अनिल लोंढे, विक्रांत पाटील, जगन्नाथ शिंदे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वैभव बोगार, तुकाराम पाटील, पांडुरंग पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख मारुती पवार, मंगेश मोकाशी, उदय भोसले, नगरसेवक अजित माने, संजय वाघमारे, रणजीत घाडगे, विश्वनाथ पाटील, माजी सरपंच सुनील माळी, चंद्रकांत पाटील, प्रताप पाटील, अय्याज मुल्ला, राजू घाडगे यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा