

शिराळा शहर : शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या प्रभाग 4 मधील नगरसेवक पदासाठीची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिले आहेत.
आदेशात म्हटले आहे की, ज्या नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये अपील दाखल करण्यात आले होते, त्या अपिलावर निकाल 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत निर्णय होणे आवश्यक होते. जेणेकरून संबंधित उमेदवारास नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी मिळाला असता व त्यानंतर 26 नोव्हेंबररोजी वैधरित्या नामनिर्देशीत उमेदवारास निवडणूक चिन्ह वाटप करणे नियमानुसार योग्य ठरले असते.
संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अशा उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देता निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकरणी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 26 नोव्हेंबर किंवा त्यानंतर केलेली चिन्ह वाटप कार्यवाही नियमबाह्य ठरते. त्यामुळे अशा निवडणुका स्थगित करून नियमानुसार पूर्ण झालेल्या टप्प्यापासून पुढील टप्प्यासाठी संबंधित नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम देणे आवश्यक आहे. त्या जागेच्या निवडणुका 4 नोव्हेंबर रोजी घेऊ नयेत. या ठिकाणी नव्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुका जारी करण्याची तारीख 4 डिसेंबर, नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबररोजी दुपारी तीनपर्यंत. निवडणूक चिन्ह व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दि. 11 डिसेंबर, मतदान दि. 20 डिसेंबर, मतमोजणी व निकाल 21 डिसेंबररोजी होईल, असे आदेशात म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाबाबत दावा
याठिकाणी छाननीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाबाबत दावा दाखल करण्यात आला होता. याबाबत ईश्वरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात दि. 24 नोव्हेंबररोजी दावा फेटाळण्यात आला होता. क्रमांक 4 या प्रभागातील प्रदीप यादव व अभिजित शिवाजीराव यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यातील अभिजित यादव यांना पक्षाची उमेदवारी जाहीर झाली, मात्र निवडणूक आयोगाच्या नवीन निर्णयामुळे त्यांना पक्षाचे चिन्ह मिळाले नाही. त्यांनी छाननीवेळी आक्षेप घेतला होता.
तसेच निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली होती. जिल्हा सत्र न्यायालयात दि. 24 नोव्हेंबर रोजी दावा फेटाळण्यात आला होता. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार ज्या अपिलाचा निर्णय दि. 22 नोव्हेंबरनंतर देण्यात आलेला आहे, त्या जागेची निवडणूक स्थगित करुन सुधारीत कार्यक्रमानुसार निवडणूक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशानुसार या प्रभागात फक्त नगराध्यक्ष पदासाठी फक्त मतदान होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी नव्याने मतदान यंत्रांचे कमिशनींग करावे लागणार आहे.