

महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिका निवडणुकीत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही चिन्ह वाटप करून बेकायदेशीर काम करत आहात, असे सांगूनही अपुऱ्या माहितीच्या आधारे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी योगेश पाटील यांनी राजकीय दबावापोटी ही प्रक्रिया रेटत नेली. त्यांच्या चुकीमुळेच पालिकेची निवडणूक लांबणीवर पडली. यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्याविरोधात याचिका दाखल करणार आहे, असा इशारा गिरीस्थान नगरविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार व शिवसेनेचे नेते कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कुमार शिंदे म्हणाले, नियमानुसार थकबाकी असणारे उमेदवार निवडणुकीला पात्र ठरत नाही. याबाबत पुरावे देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. परंतु, राजकीय दबावापोटी नगरपालिकेने त्यांना तुटपुंजी रक्कम भरायला लावून उमेदवारांना थकबाकी नसल्याबाबतचे पावती दिली. त्यामुळे याचिका दाखल केली होती. ही कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना देखील निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के, सहा निवडणूक निर्णय अधिकारी योगेश पाटील यांनी उमेदवारांना चिन्ह वाटप केले.
याबाबत राज्य निवडणूक आयोगाला कळवले होते. त्यांनी तात्काळ ही निवडणूक प्रक्रिया स्थगित केली आहे. आता नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. अन्य ठिकाणी होत असणाऱ्या नगरपालिका निवडणूक निकालाचा परिणाम हा महाबळेश्वरच्या निवडणुकीवर देखील होऊ शकतो. त्यामुळे त्यांचे निकाल राखून ठेवावेत. असे पत्र राज्य निवडणूक आयोगाला देणार आहे. याचबरोबर जिल्हा न्यायालयाने फेटाळलेली याचिकेचे अपील कोल्हापूर उच्च न्यायालय दाखल करणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. यावेळी आघाडीचे उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.