

नाशिक : राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना आता काही जिल्ह्यांतील नगरपालिकांच्या निवडणुकांसह काही प्रभागांतील निवडणुकांना ब्रेक लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील नगर परिषदांचा यात समावेश नसला, तरी काही प्रभागांतील निवडणुकांना स्थगिती मिळाली आहे. यात सिन्नर नगर परिषदेच्या चार, ओझर नगर परिषदेच्या दोन तर, चांदवड नगर परिषदेच्या एका जागेचा समावेश आहे. प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला आहे.
प्रचारतोफा अंतिम टप्प्यात
निवडणुकांच्या प्रचारतोफा अंतिम टप्प्यात आल्या असतानाच काही नगरपालिकांतील विविध प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामध्ये सोलापूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धारशिव या जिल्ह्यांतील नगर परिषदांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक दोन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्रमांक ४ अ अनुसूचित जाती (महिला), प्रभाग क्रमांक ५ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक १० ब सर्वसाधारण तसेच ओझर नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक १ अ अनुसूचित जाती, प्रभाग क्रमांक ८ ब सर्वसाधारण, तर चांदवड नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक ३ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रभागातील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सहआयुक्त श्याम गोसावी यांनी आदेश काढले आहेत. या आदेशामुळे मंगळवारी (दि. २) या प्रभागांत मतदान होणार नाही.
जळगाव : जिल्ह्यातील 18 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमातील बारा जागांना स्थगिती देण्यात आली आहे. या सर्व 12 जागांसाठी माघारी, मतदान आणि निकालाची नवीन तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली.
निवडणूक कार्यक्रम अंतिम टप्प्यात असताना माघारी आणि छाननीच्या काळात काही उमेदवारांनी एकमेकांवर हरकती दाखल केल्या होत्या. या हरकतींच्या संदर्भातील प्रकरणे न्यायालयात प्रलंबित होती. न्यायालयाचा निकाल 22 तारखेला अपेक्षित असतानाही तो 25 रोजी लागला. त्यामुळे निवडणूक आयोगाने संबंधित जागांवरील कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
स्थगित झालेल्या जागांमध्ये खालील स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे...
अमळनेर: 1 अ
सावदा: 2 ब, 4 ब, 10 ब
यावल: 8 ब
वरणगाव: 10 अ, 10 क
पाचोरा: 11 अ, 12 ब
भुसावळ: 4 ब, 5 ब, 11 ब
या सर्व जागांसाठी निवडणुकीचा नवा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल.