

मिरज : शिंदेवाडी (ता. मिरज) येथे पारधी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी सरपंच, उपसरपंच आणि दहा ग्रामस्थांविरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युवरानी शांपानी भोसले (वय 22, रा. शिंदेवाडी स्मशानभूमीजवळ) यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी, भोसले कुटुंब गेल्या चार वर्षांपासून शिंदेवाडीत राहते. ते मजुरीचे काम करतात. ते शेळ्या व दोन जर्सी गाईंचे दूध गावातील डेअरीवर घालत होते. त्यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकल्याचा आरोप आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी पाण्याच्या टाकीजवळ राहणार्या भोसले कुटुंबाला गळती असल्याचे सांगून काही ग्रामस्थांनी तेथून निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे 2 ऑगस्टरोजी भोसले कुटुंब शिंदेवाडी गायरान भागात झोपडी बांधण्यासाठी गेले होते.यावेळी अमर पाटील याने तेथे जाऊन युवरानी यांच्या केसांना ओढून मारहाण केली. ‘तू इथे झोपडी बांधायची नाही, जागा काय तुझ्या बापाची आहे काय?’ असे म्हणत शिवीगाळ करून ढकलून दिल्याची तक्रार युवरानी यांनी 4 ऑगस्टरोजी ग्रामीण पोलिसात दिली होती.
या तक्रारीमुळे गावातील शंकर पाटील, अमर पाटील, बी. टी. पाटील, काका पाटील, सदा पाटील, अविनाश पाटील, पोपट माने यांच्यासह सरपंच, उपसरपंच, गावातील किराणा दुकानदार कुमार, डेअरीचालक व पीठ गिरणीचालक यांनी ग्रामसभा घेऊन पारधी कुटुंबाला मदत न करण्याचे ठरवल्याची तक्रार आहे.
गावात किराणा दुकानदाराने संबंधित पारधी कुटुंबाला साहित्य देणे बंद केले, डेअरीवाल्याने दूध घेणे थांबवले, गिरणीवाल्याने दळण दिले नाही, पाण्याचा पुरवठा पाच दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. शंकर पाटील यांनीही पारधी कुटुंबास गावात राहू देणार नाही, असे धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.