

सांगली : दारू पिऊन वाहन चालविण्याच्या, म्हणजेच ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांमुळे निष्पापांचा नाहक बळी जात आहे. दारूड्या वाहन चालकांवर कारवाईचा धाक राहिलेला नाही. सांगली जिल्ह्यातील पोलिसांनी यावर्षी 360 दारूड्या वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 3 लाख 26 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला, म्हणजे दिवसाला एकावर कारवाई असेही होत नाही. यंदा 130 जणांचा वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) पाठवला. ही संख्याही खूपच कमी आहे. दारू पिऊन अपघात होण्याचे प्रमाण आठ ते दहा टक्के असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एकापेक्षा अनेकवेळा दोषी आढळल्यास, अशा चालकाचा वाहन परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे प्रमाण वाढविण्याची गरज मोठी आहे.
दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे रविवारी रात्री चालकासह बाराजण जखमी झाले. या घटनेने सांगली हादरली. दारूड्या चालकांमुळे अनेकजणांना प्राण गमवावा लागला आहे, तर काहीजणांना कायमस्वरूपी दिव्यांगत्व आले आहे. दारूड्या वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई मात्र कमीच पडत आहे. दारू पिलेल्या वाहन चालकाच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास कायदेशीर कारवाई केली जाते.
सांगली वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी 197 दारूड्या वाहन चालकांवर कारवाई केली असून, 58 हजारांचा दंड वसूल केला. यावर्षी आतापर्यंत 707 अपघात झाले. यामध्ये 410 जणांना प्राण गमवावा लागला. मृत, किरकोळ जखमी आणि गंभीर जखमी यांची संख्या पाहता पोलिसांची कारवाई खूपच कमी पडते, हे स्पष्ट होते.
रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण तपासण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात एक आणि वाहतूक नियंत्रण पोलिस शाखेकडे पाच, अशी सुमारे 40 ब्रेथ ॲनालायझर मशीन सांगली जिल्ह्यातील पोलिसांकडे उपलब्ध आहेत. या मशीनवर फुंकर मारल्यास त्या व्यक्तीच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण कळू शकते. पूर्वी यासाठी रक्त तपासणीस पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवावे लागत होते. आता ही तपासणी मशीनवर तातडीने होते. फुंकर मारल्यानंतर त्यात दोषी आढळल्यास संबंधिताचे वाहन जप्त करण्यात येते. या मशीनमधून तत्काळ अल्कोहोलचे प्रमाण, ठिकाण, वेळ, वाहन क्रमांक, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव याबाबत कागदाची प्रिंट येते. त्यानंतर कारवाई झालेल्याची आणि करणाऱ्याची स्वाक्षरी घेतली जाते. हा कागद न्यायालयात सादर करण्यात येतो.
मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 185 नुसार, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यास 6 महिन्यांपर्यंत कारावास किंवा 10 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. पहिल्यांदा दारू पिऊन वाहन चालवल्यासही थेट परवाना रद्द होऊ शकतो दारू पिऊन गाडी चालवताना आढळून आला, तर पहिल्यांदा त्याचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करता येतो. त्याच व्यक्तीने जर पुन्हा गुन्हा केला, तर सहा महिन्यांपर्यंत त्याचा परवाना रद्द करण्यात येतो, मात्र तिसऱ्या वेळीही पुन्हा त्याने गुन्हा केल्यास वाहन परवाना कायमस्वरूपी रद्द होऊ शकतो.