

Agriculture Status For Poultry
विटा : महाराष्ट्र शासनाने कुक्कुटपालन (पोल्ट्री) व्यवसायाला 'कृषी समकक्ष' दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय तातडीने अंमलात आणावा, यासाठी संबंधित विभागाची त्वरित बैठक घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती खानापूर तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी दिली.
खानापूर तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष (दादासाहेब) काटकर यांनी मुंबईतील मंत्रालयात पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राज्यातील पोल्ट्री उद्योगासमोरील विविध अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी त्यांनी राज्यातील सर्वात जुना आणि मोठा पोल्ट्री उद्योग विटा व खानापूर तालुक्यात असून या उद्योगाला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने हे सुवर्णमहोत्सवी वर्ष शासनाच्या वतीने साजरे करण्यात यावे, अशी मागणी केली.
यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी आपण तामिळनाडूतील आशियातील सर्वात मोठ्या पोल्ट्री उद्योगाचे केंद्र असलेल्या नामक्कल जिल्ह्यातील असल्याने या उद्योगातील समस्यांची पूर्ण जाणीव असल्याचे सांगितले. तसेच विटा येथे दोन दिवस मुक्काम करून येथील पोल्ट्री उद्योग आणि कवठेमहांकाळ परिसरातील शेळीपालन व्यवसायाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिक माहिती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संघटनेच्या वतीने मंत्री पंकजा मुंडे यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात ३१ जुलै २०२५ च्या शासन निर्णयानुसार कुक्कुटपालन व्यवसायासाठी वीजदर 'कृषी इतर'ऐवजी 'कृषी' वर्गवारीनुसार आकारण्यात यावेत, तसेच कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सौरऊर्जा पंप व सौरऊर्जा संच उभारणीस कृषी व्यवसायाप्रमाणे अनुदान देण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
या निवेदनाची तात्काळ दखल घेत मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या विषयावर चर्चा करून विभाग अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना व लेखी अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
मंत्र्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे राज्यातील पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून शासन लवकरच या मागण्यांवर ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी करेल, अशी अपेक्षा संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केली.