Sangli News : घरपट्टी वाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

स्वाक्षरी मोहिमेला प्रतिसाद : महापालिकेसमोर सोमवारी जनआंदोलन
Sangli News
घरपट्टी वाढीविरोधात काँग्रेस आक्रमक
Published on
Updated on

सांगली : महापालिका क्षेत्रातील भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी वाढीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी विश्रामबाग येथील स्फूर्ती चौकात स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलन करण्यात आले. नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते गजानन मिरजे यांनी केले.

विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्याहस्ते वाढीव घरपट्टीविरोधी स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत घरपट्टी वाढीविरोधात संताप व्यक्त केला.

चव्हाण म्हणाले, निवडणुकीपूर्वी भाजपने नागरिकांना आश्वासने दिली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच नागरिकांवर आर्थिक बोजा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणी ही सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारी असून, या निर्णयाला शहरातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात व्यापक जनमत तयार करण्यासाठी आणि पुढील लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी दि. २९ जून रोजी महानगरपालिका मुख्य कार्यालयासमोर नागरिकांच्यावतीने भव्य जनआंदोलन छेडण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते गजानन मिरजे यांनीही घरपट्टीवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी केली. नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारा हा निर्णय स्वीकारला जाणार नाही. तो प्रशासनाने त्वरित मागे घेतला नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात संतोष चौगुले, गुरुदेव चौगुले, महालिंग राजमाने, भरत पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news