

सांगली ः सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाविरोधात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, अशी एकत्रित आघाडी करण्यासंदर्भात शनिवारी दिवसभर प्रमुख नेत्यांमध्ये खलबते सुरू होती. जागा वाटपाबाबत रात्री उशिरापर्यंत कोणताही निर्णय झालेला नव्हता. दरम्यान, महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्या स्वतंत्र बैठकीत स्वबळावर लढण्याची वेळ आल्यास कोणत्या जागा लढवायच्या, याबाबत जवळपास अंतिम निर्णय होत आलेला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. तरीसुद्धा सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारीबाबत निर्णय झालेला नाही. वेळ जवळ येईल, तशा सर्वच पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील शनिवारी सांगलीत दाखल झाले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांची बैठक झाली. या बैठकीस माजी खासदार संजय पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आदी नेते उपस्थित होते. कोणत्या प्रभागात पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत?, इतर कोणत्या पक्षाबरोबर आघाडी करायची का?, यासंदर्भात चर्चा झाली. दुसर्या बाजूला आमदार जयंत पाटील व खासदार विशाल पाटील यांची बैठक झाली. या दोघांमध्ये कोणत्या ठिकाणी कोणता उमेदवार देता येईल, यासंदर्भात चर्चा झाली. रविवारी पुन्हा काँग्रेसने आमदार विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन जागा निश्चित करण्याचे ठरले.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भाजपाविरोधात सक्षम पर्याय देण्यासाठी काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी, अशी एकत्रित आघाडी करण्यासंदर्भात चाचपणी सुरू आहे. मंत्री मकरंद पाटील यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष व काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. कोणत्या जागा कोणी लढवायच्या, यावर खल सुरू होता. रविवारी सायंकाळपर्यंत राष्ट्रवादी महाआघाडीसोबत एकत्रित निवडणूक लढविणार, की स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार, हे स्पष्ट होणार आहे.
शिवसेना नेत्यांचे मुंबईकडे लक्ष
महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांचे मुंबईतील वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेणार आहेत. यामध्ये काय निर्णय होणार, याकडे शिवसेना पदाधिकार्यांचे लक्ष लागले आहे.
संजय पाटील यांच्याकडे समन्वयाची भूमिका
माजी खासदार संजय पाटील हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात सक्रिय झाले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात ते समन्वयाची भूमिका बजावत आहेत.