

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारीवरून भाजपमधील गटबाजी उफाळली आहे. मुंबईतील बैठकीत आपल्याच समर्थकांची नावे रेटण्यावरून भाजपमधील दोन नेत्यांमध्ये वादावादी झाल्याची चर्चा आहे. एका महिला नेत्यानेही रुद्रावतार धारण करत अन्य काही नेत्यांना जाब विचारला. पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे, अशी भूमिका पुढे आल्यानंतर, विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम करणार्या निष्ठावंतांना वार्यावर कसे सोडणार? असा पवित्रा काही नेत्यांनी घेतला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उमेदवारी यादी अंतिम करतील. शनिवारी ही उमेदवारी यादी प्रदेश भाजप कार्यालयातून येईल, असे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले. भाजपमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत कलह जोरात सुरू आहे. स्थानिक पातळीवर उमेदवारीवर एकमत न झाल्याने सांगलीतून नेत्यांचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले. मुंबईत गुरुवारी प्रथम सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे, तसेच पृथ्वीराज पवार, नीता केळकर उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर व त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली.
प्रदेशाध्यक्षांसमोर झालेल्या बैठकीत नेत्यांतील वाद
चांगलाच उफाळून आला. पक्षांतर्गत गटबाजी, नवा-जुना वाद यातून एकमत होण्यात अडचणी आल्या. उमेदवारीवरून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासमोरच स्थानिक नेत्यांच्या वादाला तोंड फुटले. गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आल्याची चर्चा जोरात आहे.
काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्या गटाला जागा देण्यावरून चर्चेला सुरुवात झाली. पक्षप्रवेशावेळी या नेत्यांना काही आश्वासने देण्यात आली आहेत, ती पाळायला हवीत, जागावाटप करताना जुळवून घ्यावे लागेल, असेही वरिष्ठ नेत्यांनी सूचित केल्याचे समजते.
दरम्यान, भाजपमधील एका जुन्या गटाच्या समर्थकांना डावलले जात असल्यावरून दोन नेत्यांमध्ये वादाचा प्रकार उद्भवल्याची चर्चाही जोरात आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेत संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली. रात्री उशिरा या यादीवर एकमत झाले. मात्र शुक्रवारी सकाळी काही वेगळीच नावे यादीत आली. काही उमेदवारांची नावे रात्रीत बदलली. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा नाराजीनाट्य पसरले. या सर्व प्रकाराची चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान, भाजपची उमेदवारी यादी अंतिम झाली असून शनिवारी ही यादी प्राप्त होईल, असे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले. जयश्री पाटील समर्थकांना सात ते आठ, तर पृथ्वीराज पाटील समर्थकांना सुमारे पाच जागा मिळाल्याची चर्चा आहे.
राज्यात महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीशी दोन दिवसात भाजपची कसलीही चर्चा झाली नाही. राष्ट्रवादीकडून जागांची यादीच आली नसल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे नेते मोहन वनखंडे यांना उमेदवारी देण्यास भाजप नेते आमदार सुरेश खाडे यांचा जोरदार विरोध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतही आ. खाडे यांनी हा पवित्रा कायम ठेवला. त्यामुळे शिवसेनाही महायुतीबाहेर पडण्याची शक्यता वाढली आहे. जनसुराज्य आणि आरपीआय हे महायुतीत असणार आहेत.
अनेक माजी नगरसवेकांचा पत्ता कट?
शुक्रवारी दुपारपासून भाजप उमेदवारांची नावे अनधिकृतपणे बाहेर चर्चेत येऊ लागली. कोणाला संधी मिळाली, कोणाचा पत्ता कट झाला, याची चर्चा सुरू झाली. अनेक माजी नगरसेवकांचा पत्ता कट झाल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे अनेक इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. भाजपची उमेदवारी यादी अधिकृतपणे घोषित होण्याकडे लक्ष लागले आहे. शनिवारी उमेदवारी यादी घोषित होईल, असे संकेत मिळत आहेत. दरम्यान, अनेकांना उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे.
विजय बंगल्यावर चिंता; अन्य पक्षांकडून संपर्क?
महापालिका निवडणुकीत 22 जागा मिळाव्यात, अशी मागणी जयश्री पाटील यांनी भाजप नेत्यांकडे केलेली आहे. मात्र, सात ते आठ जागा मिळतील, असे संकेत मिळत आहेत. त्यातही जयश्री पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या संतोष पाटील आणि उत्तम साखळकर यांच्या उमेदवारीचा संभ्रम शुक्रवारी दिवसभर कायम होता. प्रभाग क्रमांक 9 मधून सर्वसाधारण प्रवर्गातून आ. सुधीर गाडगीळ यांचे कट्टर समर्थक शहर जिल्हा उपाध्यक्ष अतुल माने यांना, तर संतोष पाटील यांना सर्वसाधारण प्रवर्गाऐवजी ना.मा.प्र.मधून उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती पुढे आली. इच्छुक व कार्यकर्ते हे जयश्री पाटील यांचे निवासस्थान असलेल्या विजय बंगल्यावर एकत्र आले. उमेदवारीवरून तिथे चिंतेचे सावट दिसत होते. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी जयश्री पाटील यांच्याशी संपर्क साधला असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
नीता केळकर यांचा रुद्रावतार
मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर उमेदवारी यादीवर चर्चा सुरू होती. त्यावेळी प्रभाग क्रमांक 11 मधील सर्वसाधारण प्रवर्गातून मुलाला उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपच्या नेत्या नीता केळकर आग्रही होत्या. मात्र, पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यावरून एक नेता विशेष आग्रही होता. त्यावरून केळकर यांनी रुद्रावतार धारण करत स्थानिक सर्व नेत्यांना चांगलाच जाब विचारला.
माजी खासदार संजय पाटील होणार सक्रिय
महापालिका निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील हेही आता सक्रिय होत आहेत. तासगाव नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी विजयाचा गुलाल लावला आहे. ते आता सांगलीतही विशेष सक्रिय होत आहेत. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह संचारला आहे.
मला सर्व पर्याय खुले : संतोष पाटील
महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती व भाजप नेत्या जयश्री पाटील यांचे कट्टर समर्थक संतोष पाटील यांना प्रभाग क्रमांक 9 मधून सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत विचारले असता संतोष पाटील म्हणाले, मला सर्व पर्याय खुले आहेत. मी एक तर तटस्थ राहीन, कदाचित काँग्रेस, राष्ट्रवादीकडून लढेन; पण हे सर्व करण्यापूर्वी नेत्या जयश्री पाटील यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेईन.