

ईश्वरपूर : ‘पाच लाख रुपये द्या, नाही तर तुमच्या मुलाला ठार मारीन,’ अशी धमकी देऊन खंडणी मागण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी निवृत्त कर्मचारी विनायक गजानन साळी (वय 66, रा. विनायकनगर, ईश्वरपूर) यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विनायक हे निवृत्त शासकीय कर्मचारी आहेत. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान त्यांच्या मोबाईलवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून वारंवार संदेश येत होते. ‘पाच लाख रुपये द्या, पैसे नाही दिले, तर तुमचा मुलगा ओंकार यास जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी संशयिताने संदेशाद्वारे दिली. सोमवारी विनायक यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.