

नेर्ले : गेल्या तीन वर्षांपासून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या पेठ ग्रामस्थांनी पाणी टंचाईच्या प्रश्नासाठी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला. ग्रामपंचायतीच्या कारभाराचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. पाणी प्रश्न लवकर सोडवावा यासाठी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. पाणी प्रश्नाचे गाजर दाखवून राष्ट्रवादीने सत्ता मिळवली. मात्र पाणी प्रश्न आहे तसाच आहे. आताही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाण्यावर राजकारण करू नये असा आरोप मोर्चाच्यावेळी करण्यात आला.
शुक्रवारी सकाळी गावातील बाजारपेठ येथे धडक मोर्चासाठी ग्रामस्थ जमले होते. त्यामध्ये महिला घागरी घेऊन सहभागी झाल्या होत्या. मोर्च्यात भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, रामोशी समाजाचे नेते मोहन मदने, माजी जि. प. सभापती जगन्नाथ माळी, माजी उपसरपंच शंकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाध्यक्ष महाडिक म्हणाले, तीन वर्षे तुम्ही सत्तेवर आहात. पेठ गावातील जनतेसाठी तुम्ही काय केले? खोटे बोलून सत्तेवर आला. पाणी योजना आम्ही मंजूर केली होती. टप्प्या-टप्प्याने निधी येऊन काम सुरू होते. सत्तांतर झाले व योजना तशीच रखडली. जनतेला सहा महिन्यात पाणी प्रश्न सोडवतो असे आश्वासन दिले होते. तीन वर्षे झाली तुम्ही काहीही करू शकलेला नाही. यावेळी भारती कांबळे, वसुधा दाभोळे, राधा हवलदार, अमृता भोसले, अल्फिया ढगे, साक्षी हराळे, शोभा शिणगारे, नीता भोसले, प्रशांत कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी सरपंच मीनाक्षी महाडिक, व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या संचालिका तेजस्वी महाडिक, राहुल पाटील, विकास दाभोळे, आसिफ जकाते, आमीर ढगे सहभागी झाले होते.