

सांगली : शहरातील शामरावनगर येथे रात्री सराईत गुन्हेगाराचा तिघांनी भोसकून निर्घृण खून केला. चैतन्य आप्पासाहेब तांदळे (वय 17, रा. रामनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) असे त्याचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चैतन्य तांदळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता. चैतन्य तांदळे हा शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास शामरावनगर येथे एका मित्राकडे गेला होता. संबंधित मित्राला सोबत घेऊन शामरावनगरमधून जात असताना या ठिकाणी दबा धरून बसलेल्या तीन सराईत हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला.
चैतन्य तांदळे याच्यावर हल्ला होताच त्याच्यासोबत असणाऱ्या अल्पवयीन मित्राने घटनास्थळावरून पलायन केले. दरम्यान तीनजणांनी चैतन्य तांदळे याच्यावर हल्ला चढविला. चैतन्य तांदळे याच्या डोक्यात, मानेवर आणि पोटात वर्मी घाव बसल्याने तसेच त्याच्या डोक्यात पेव्हिंग ब्लॉक घातल्याने तो जागीच ठार झाला. चैतन्य तांदळे याचा मारेकऱ्यांसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादानंतर मारेकरी त्याच्या मागावर होते. शुक्रवारी रात्री चैतन्य तांदळे हा सापडल्याने हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला.
चैतन्य तांदळे हा ठार झाल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. चैतन्य तांदळे याचा खून करणाऱ्या तिघा संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्याच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि सांगली शहर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान घटनास्थळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, पोलिस उपअधीक्षक संदीप भागवत, पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
सांगलीत नऊ दिवसात दोन खून
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणूक काळात सांगली शहरात नऊ दिवसात दोन खून झालेत. निवडणूक आचारसंहितेमुळे शहरात ठीक ठिकाणी पोलिसांनी चेक पोस्ट उभारले आहेत. शामरावनगर येथील पोलिसांनी उभारलेल्या चेक पोस्ट पासून केवळ 50 ते 100 मीटर अंतरावर हा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.