

ईश्वरपूर : गेली 30-35 वर्षे ज्या बाकड्यावर बसून माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील ईश्वरपूर शहराचा कारभार पाहत होते, लोकांच्या अडीअडचणी समजावून घेत होते, ते त्यांचे बाकडे नऊ वर्षांनंतर नगरपालिकेत पुन्हा त्याचठिकाणी बसवले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांनी नुकताच या बाकड्यावर बसून विजयभाऊंच्या आठवणींना उजाळा दिला.
पालिकेतील सत्तांतरानंतर सन 2016 साली हे बाकडे या ठिकाणावरून गायब झाले होते. उरूण-ईश्वरपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची सत्ता असताना गेली 30-35 वर्षे माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील हे नगराध्यक्षांच्या दालनाबाहेर ठेवलेल्या बाकड्यावरच बसून कारभार पाहायचे. विजयभाऊ नगराध्यक्षांच्या खुर्चीत कमी व बाकड्यावरच जास्त वेळ बसलेले दिसायचे. त्यामुळे विजयभाऊंचे हे बाकडे नेहमीच चर्चेत असायचे. मात्र सन 2016 साली नगरपालिकेत सत्तांतर झाले व विकास आघाडीची सत्ता आली. त्यावेळी आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी विजयभाऊंचे हे बाकडे तेथून हलवले. विकास आघाडीच्या सत्तेची पाच वर्षे व त्यानंतर प्रशासकांची चार वर्षे अशी नऊ वर्षे हे बाकडे या ठिकाणी दिसले नाही.
आता नगरपालिकेत पुन्हा आ. जयंत पाटील गटाची सत्ता आली आहे. सोमवारी नवनियुक्तनगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचा पदग्रहण सोहळा झाला. यावेळी आ. जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी विजयभाऊंचे ते बाकडे पुन्हा त्याच ठिकाणी ठेवण्यात आले. या बाकड्यावर आ. जयंत पाटील, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे. विजयभाऊ यांचे चिरंजीव संदीप पाटील व त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी बसून विजयभाऊंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.