

Gopichand Padalkar statement on Jayant Patil Sangli reactions news
इस्लामपूर : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर केलेल्या टीकेचे वाळवा तालुक्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. पडळकर यांचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शुक्रवारी (दि.१९) इस्लामपुरात निषेध मोर्चा काढला.
जत येथील कार्यक्रमात आमदार पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. तसेच लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला. पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांच्या समर्थकांच्यात संतापाची लाट पसरली. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.
पडळकर यांच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.१९) इस्लामपूर तहसील कार्यालयात पक्षाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. पडळकर यांच्यावर भाजप पक्षाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. अनेक पदाधिकाऱ्यांनी पडळकर यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.