

आटपाडी : माणगंगा साखर कारखान्याच्या जमिनीचे बोगस खरेदी दस्त झाले असल्याचा आरोप करत या खरेदी पत्रांची सर्व कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुजारवाडीकरांना केले.
पुजारवाडी (आटपाडी) येथे मायाक्का मंदिरासमोर सभामंडप भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विष्णुपंत अर्जुन, जयवंत सरगर, दादासाहेब हुबाले, अमोल काटकर, विनायक पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. पडळकर म्हणाले, लोकांची मेंढरे चरायला गेली असताना, इकडे बोगस दस्ताने जमिनी खरेदी केल्या गेल्या. कारखाना ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. शेतकर्यांच्या जमिनी फसवून हस्तगत करूनच हा कारखाना उभा केला गेला आहे.
आ. पडळकर यांनी कारखान्याच्या जागेतून हजारो ब्रास मुरूम चोरी होत असल्याचा आरोप केला. याबाबत जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केल्याचे आणि दोषींच्या उतार्यावर बोजा चढवावा, अशी मागणी केल्याची माहिती दिली.