Gopichand Padalkar- Jayant Patil
संभाजीनगर : भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्यांचे वक्तव्य महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचा अपमान आहे, तसेच टीकेने मर्यादा ओलांडल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहेत. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
दरम्यान, पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या सिडको पोलिस ठाण्यात गुरूवारी रात्री ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी पडळकर यांनी जेथे वक्तव्य केले, तेथे तक्रार अर्ज वर्ग केला जाईल, असे सांगून अर्ज स्वीकारला. त्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?
पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन आक्षेपार्ह टीका केली. त्यांच्या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात मोठे वादंग निर्माण झाले. जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला हा माणूस आपण किती बिनडोक आहे, हे सिद्ध करतोय. त्याचे काम फक्त गोपीचंद पडळकरला बदनाम करणे एवढेच. तो एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न करत आहे. माझी जाणीवपूर्वक बदनामी करत आहे, असा आरोप केल्यानंतर गोपिचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह टीका केली.