

विटा : कापसाच्या एकतर्फी दरवाढीमुळे यंत्रमागांबरोबरच सुतगिरण्याही बंद पडणार आहेत, अशी साधार भीती महाराष्ट्र प्रायव्हेट स्पिनिंग मिल असोसिएशनचे संचालक किरण तारळेकर यांनी व्यक्त केली आहे.
देशात कापसाचा अतिरिक्त साठा आणि विक्रमी आयात झालेली आहे. मात्र त्याच वेळी कापसाच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे, त्यामुळे ही एकतर्फी वाढ संपूर्ण वस्त्रोद्योगाला मोठ्या संकटात लोटणारी ठरली आहे. याबाबत महाराष्ट्र प्रायव्हेट स्पिनिंग मिल असो. चे संचालक किरण तारळेकर म्हणाले,'कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया' (सी आय ए) च्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस क्लोजिंग स्टॉक म्हणजे विकला न गेलेला माल मागील वर्षापेक्षा ६८ टक्क्यांनी जास्त म्हणजेच तब्बल ९३ लाख गाठींपेक्षा अधिक राहील. तसेच, केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२६ पर्यंत कापूस आयातीवर शुल्क माफ केल्याने, मागील वर्षाच्या ४१ लाख गाठींच्या तुलनेत यंदा विक्रमी ६३ लाख गाठींची आयात होत आहे.
ऑक्टोबर २०२६ पासून नवीन कापूस बाजारात विक्रीसाठी येत असताना देशांतर्गत दर कमी होणे किंवा स्थिर राहणे अपेक्षित होते. मात्र, ५६ हजार रुपये खंडी असलेला कापूस अचानक ७० हजार रुपये खंडी या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. मागणीपेक्षा अधिक साठा आणि नवीन पिका ची चाहूल असताना झालेली ही दरवाढ गोंधळात टाकणारी आहे. कदाचित बड्या व्यापारी वर्गाने संगनमताने गोदामात कापूस अडवून कृत्रिम टंचाई निर्माण केली असावी असा संशय वस्त्र साखळीतून व्यक्त होत आहे.
राजस्थानातील रंगप्रक्रिया उद्योग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांमुळे गेल्या दोन महिन्यां पासून बंद असल्याने साध्या यंत्रमागांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला असून बाजारात कापडाचा प्रचंड साठा पडून आहे. त्यातच स्वयंचलित यंत्रमागांसमोर विविध संकटे उभी ठाकली आहेत. विटा, इचलकरंजी, मालेगाव, सोलापूर आणि भिवंडी यांसारख्या राज्यातील प्रमुख वस्त्रोद्योगाची ठिकाणे आधीच अंशतः सुरू आहेत आणि सुताची मागणी कमी होत चालली आहे.
अशातच कापसाच्या दरातील वाढीमुळे यंत्रमागांपाठोपाठ आता राज्यातील सुत गिरण्याही पूर्णपणे बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्याच्या या विदारक आणि गोंधळात टाकणाऱ्या परिस्थितीचा केंद्र व राज्य शासनाने तात्काळ आढावा घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आम्ही महाराष्ट्र प्रायव्हेट स्पिनिंग मिल असो.च्यावतीने केली असल्याची माहिती ही किरण तारळेकर यांनी दिली आहे.