

तासगाव : बलगवडे ( ता, तासगाव ) येथे नशेच्या ८५ इंजेक्शनचा ३९ हजार रुपये किमतीचा साठा तासगाव पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल श्रीकांत सानप यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
या प्रकरणी नागेश अरविंद औताडे ( वय २१) व समीर अजमद मुलाणी दोघेही राहणार बलगवडे अशी संशयितांची नावे आहेत. पोलीसांनी बलगवडे येथे नशेच्या औषधांच्या इंजेक्शनची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बलगवडे ते मांजर्डे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित नागेश औताडे याच्या पत्र्याचा शेडमध्ये छापा टाकला असता त्या ठिकाणी मेफेन्टरमाइन इंजेक्शनचे ८५ बॉक्स आढळून आले.
प्रति इंजेक्शनची किंमत ४३५ रुपये असून एकूण ३७ हजार १७ रुपयांचा साठा जप्त केला आहे. ही नशेची इंजेक्शन विक्रीसाठी आणली असल्याचे पोलिसातून सांगण्यात आले. संशयित नागेश औताडे याचा साथीदार समीर मुलाणी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
तालुक्यात खळबळ
नशेसाठी वापरली जाणारी इंजेक्शन बलगवडे सारख्या ग्रामीण भागात मिळून आल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यावरून तालुक्यात मोठी चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर हा नशेच्या इंजेक्शनचा साठा सापडल्याने तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे याला पुष्टी मिळत आहे.