

आटपाडी : तालुक्यातील विविध तलाव परिसरातून शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींवरील केबल चोरीच्या घटना सातत्याने वाढत असून, अनेक ठिकाणी एकाच तलावातील केबल तब्बल तीन ते चार वेळा चोरीला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही चोरीचा छडा लागत नसल्याच्या निषेधार्थ रविवारी दुपारी शेतकऱ्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात धडक देत तीव्र नाराजी व्यक्त केली.
आटपाडी येथील जेष्ठ नेते आनंदराव बापू पाटील, भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. वसंतराव पाटील, मुरलीधर पाटील, प्रताप देशमुख, जयकुमार चव्हाण, जालिंदर खंडागळे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलीस ठाण्यात कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच एका कर्मचारी यांनी "तुम्ही बाहेर बसा" अशी उद्धट वागणूक दिल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी व नेत्यांनी थेट पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. केबल चोरीच्या घटनांबाबत पोलिसांनी तात्काळ ठोस कारवाई करावी, चोरीमागील टोळीचा शोध घ्यावा आणि यापुढे अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तालुक्यातील अनेक तलाव परिसरात रात्रीच्या वेळी विद्युत मोटारींवरील केबल चोरट्यांकडून कापून नेल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून पिकांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. चोरी झाल्यानंतर शेतकरी पोलीस ठाण्यात धाव घेतात, तक्रारी नोंदवल्या जातात; मात्र पुढे तपासाची गती दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. यावेळी शेतकरी लक्ष्मण सरगर यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली व्यथा मांडली. "गेल्या काही महिन्यांत माझ्या शेतातील केबल तब्बल तीन वेळा चोरीला गेली आहे. प्रत्येक वेळी नवीन केबल टाकण्यासाठी ७५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागला. तरीही चोरीच्या घटना थांबत नाहीत. केबल चोरीमुळे पिकांना वेळेवर पाणी देता आले नाही आणि उभी पिके वाया जाण्याची वेळ आली आहे.
पोलिसांनी तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा आमच्यासारख्या शेतकऱ्यांना फाशी घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही," अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.वारंवार होणाऱ्या चोरीमुळे शेती करणे अवघड बनले असून आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी आनंदराव बापू पाटील म्हणाले , "शेतकरी आधीच नैसर्गिक संकटे, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावाच्या समस्यांनी त्रस्त आहे. त्यात केबल चोरीची भर पडली आहे.पोलिसांनी केवळ तक्रारी नोंदवून न घेता चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील," असा इशारा दिला.
दरम्यान, आंदोलनामुळे काही काळ पोलीस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. केबल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असून, पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी ४० ते ५० शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल केल्यानंतर ठिय्या आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.