

सांगली : महिना 5 टक्के व्याजाने घेतलेल्या 25 लाख रुपयांच्या वसुलीसाठी शिवीगाळ करीत घरात घुसून एका खासगी सावकाराने महिलेस दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच घरातील एका महिलेचा संशयिताने विनयभंग केला. याप्रकरणी शुभदा प्रमोद पाटील (वय 62, रा. राजमाने हौसिंग सोसायटी, यशवंतनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जिनेंद्र पाटील (रा. दुधगाव, ता. मिरज) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती अशी, फिर्यादी शुभदा पाटील या व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी संशयित जिनेंद्र पाटील याच्याकडून महिना 5 टक्के व्याजाने 25 लाख रुपये घेतले होते. याबदल्यात फिर्यादी शुभदा यांनी चार महिन्यांचे व्याज असलेला 5 लाखांचा धनादेश पाटील याला दिला होता. सदर धनादेश जिनेंद्र पाटील याने वठवून रक्कम परस्पर काढून घेतली. यानंतर मंगळवारी संशयित जिनेंद्र पाटील हा चारचाकीतून (क्र. एमएच 09 डीए 4108) फिर्यादी शुभदा पाटील यांच्या घरासमोर आला. अंगणातून त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. माझे घेतलेले पैसे द्या किंवा मला व्याज द्या, असा हेका त्याने लावला. यावेळी शुभदा यांनी घराबाहेर येऊन त्यास, आता माझा मुलगा ओंकार हा आवरत आहे, तर पती आणि दुसरा मुलगा बाहेर गेल्याने पाच मिनिटे थांबण्यास सांगितले. याचा राग आल्याने संशयित जिनेंद्र हा त्याचा मित्र सुजित साजणे याच्यासमवेत घराचा दरवाजा उघडून आत येऊन बसला. त्यानंतर देखील त्याने शिवीगाळ करीत, तुमचे घर विकून मला व्याजाचे पैसे द्या, अशी मागणी केली. यावेळी त्याने घरातील एका महिलेचा विनयभंग केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.