

मुंबई : पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून वृद्धाची फसवणूक केल्याची घटना सांताक्रूझ परिसरात घडली. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
सांताक्रूझ येथे राहणारे तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांची एक दुध डेअरी आहे. त्या दुध डेअरीतून मिळणारे पैसे ते पत्नीच्या आजारपणाला वापरत होते. उपचारादरम्यान त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. तसेच अंत्यविधी गावी केल्याने त्यांच्याकडील होती ती रक्कमही संपली होती. त्याच दरम्यान एकाने त्यांची ओळख खान नावाच्या व्यक्तीशी करून दिली. तक्रारदारांनी अनेकांकडून पैसे घेतले होते. ते पैसे त्यांना परत करायचे होते. तेव्हा तक्रारदाराने खान याला त्याच्या पैशाच्या अडचणीबाबत सांगितले.
गेल्या महिन्यात खान याने त्याच्या ओळखीच्या साहिल आणि इम्रान या मामा-भाचांनी पैशाचा पाऊस पाडला असे भासवले. त्यानंतर तक्रारदार यांना भेटण्यासाठी एका ठिकाणी नेण्यात आले. चहापाणी झाल्यावर त्यांना सांताक्रूझ चौपाटी परिसरात नेण्यात आले. त्या परिसरात तो जमिनीवर कापड अंधरून पैशाचा पाऊस पाडतो असे सांगितले. त्याच दरम्यान एकाने काळ्या कपड्याखाली हात घालून काही रक्कम काढली. त्यामुळे तक्रारदारांचा त्यावर विश्वास बसला. त्यानंतर खान हा सुरत येथे निघून गेला.
तक्रारदार हे लालचेपोटी पैशाचा पाऊस पाडण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी गेले. त्यानंतर ते पगली लेन परिसरात गेले. तेथे गेल्यावर त्यांनी दीड लाख रुपये कपड्यात ठेवले. त्यानंतर त्यांना पैशाने भरलेली एक बॅग दिली. बॅग दिल्यावर ते निघून गेले. काही वेळाने तक्रारदारांनी बॅग उघडली असता त्यात खऱ्याऐवजी खोट्या नोटा असल्याचे निदर्शनास आले. या फसवणूकप्रकरणी त्यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.