

जत : तालुक्यातील दुष्काळी व वंचित भागासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची आमदार गोपीचंद पडळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली.
मंगळवारी सकाळी बेडग (ता. मिरज) येथील पंपगृह क्रमांक 1 येथे पंपगृहाच्या कार्यप्रणालीची तपासणी करून योजनेची एकूण प्रगती, पाणीपुरवठ्याची क्षमता तसेच शेतकऱ्यांना होणाऱ्या लाभाची माहिती घेण्यात आली. त्यानंतर सलगरे (ता. मिरज) येथे सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाची पाहणी केली. आतापर्यंत 1,200 मीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे नियोजनबद्ध पद्धतीने प्रगतिपथावर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या पाहणीवेळी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित कोरे, उपविभागीय अभियंता डवरी, कनिष्ठ अभियंता कोळी, शाखा अभियंता धनवडे तसेच संबंधित अधिकारीवर्ग उपस्थित होता.