

महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक तेरा. सांगलीच्या राजकारणात कायम चर्चेत असलेला, निवडणुकीत पार्टी स्पीड वेगळ्याच उंचीवर नेणारा हा प्रभाग. सांगली नगरपालिकेची निवडणूक असो अथवा त्यानंतरची सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक; काँग्रेस, अपक्ष, राष्ट्रवादी, भाजप असा राजकीय झोका या प्रभागाने अनुभवलेला आहे. सांगलीवाडीत प्रत्येकवेळी चुरशीची, हाय-व्होल्टेज लढत ठरलेलीच. यावेळी तीन जागांसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष आघाडी अशी थेट आणि जोरदार चुरस रंगली आहे. सांगलीवाडीची राजकीय नस पुन्हा धडधडू लागली आहे. हाय-व्होल्टेज रणांगणातील ही अटीतटीची लढत महापालिका क्षेत्रात लक्षवेधी ठरत आहे.
भाजपकडून 13- अ मधून महाबळेश्वर चौगुले, 13- ब मधून मीनल पाटील आणि 13- क मधून अनुराधा मोहिते हे तीन उमेदवार आहेत. समोर काँग्रेस-राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आघाडीचे पॅनेल आहे. 13- अ मधून अभिजित कोळी (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष), 13- ब मधून दीपाली पाटील (काँग्रेस) आणि 13- क मधून अश्विनी कदम (काँग्रेस) हे उमेदवार आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बाजूंनी उतरलेले उमेदवार हे केवळ पक्षाचे चेहरे नसून, स्थानिक राजकारणाचा वारसा आणि अनुभव घेऊन आलेले आहेत.
अनुभव, नाती, संघटन, स्थानिक प्रभाव
भाजपच्या उमेदवार मीनल पाटील या माजी आमदार दिनकर पाटील यांच्या स्नुषा व महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अजिंक्य पाटील यांच्या पत्नी आहेत. काँग्रेसचे नेते आ. डॉ. विश्वजित कदम व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत यांच्या मावसबहीण अशीही ओळख त्यांची पुढे आली आहे. अनुराधा मोहिते यांचे चुलत सासरे नगरसेवक होते. महाबळेश्वर चौगुले गावाच्या राजकारणात सक्रिय आहेत. विरोधी पॅनेलचे युवा उमेदवार अभिजित कोळी यांचे वडील नगरसेवक होते. दीपाली पाटील यांचे पती नगरसेवक होते, तर चुलत सासरे नगराध्यक्ष होते. अश्विनी कदम यांची सासू तसेच सासूची सासू नगरसेवक होती. त्यामुळे सांगलीवाडीतील लढत केवळ पक्षीय नसून, अनुभव, नाती, संघटन आणि स्थानिक प्रभाव यांचीही आहे.
बांधणी अनेक वर्षे; निकाल एका दिवसाचा
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पॅनेल्सच्या नेत्यांनी गेल्या वर्षभरात निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन केले. बूथनिहाय बांधणी, मतदार संपर्क, सामाजिक समीकरणे आणि स्थानिक प्रश्न, कामे यांच्याभोवती प्रचाराची दिशा ठरवण्यात आली. आता प्रत्यक्ष प्रचाराच्या रणधुमाळीत सांगलीवाडीची पारंपरिक चुरस पुन्हा दिसू लागली आहे. दोन्ही पॅनेल्सच्या नेत्यांची राजकीय बांधणी अनेक वर्षांची आहे. दि. 16 जानेवारीरोजी निकाल काय लागणार, याकडे लक्ष लागले आहे.