

सांगली : सोने आणि चांदीचे कॉईन देण्याचे आमिष दाखवून एकाकडून 8 लाख रुपये घेतले. त्या बदल्यात बनावट सोने देऊन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सुधीर आनंदराव खराडे यांनी दोन पुरूष व एक महिला, अशा तिघांविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तिघा संशयितांनी सुधीर खराडे यांना सोने आणि चांदीचे कॉईन देण्याचे आमिष दाखवले होते. त्यामुळे सोने आणि चांदीचे कॉईन घेण्यासाठी सुधीर खराडे यांनी तिघांना 8 लाख रुपये दि. 27 डिसेंबर 2025 रोजी दिले होते. त्यानंतर तिघांनी सुधीर खराडे यांना 8 लाख रुपयांच्या बदल्यात सोने दिले. परंतु त्या सोन्याची तपासणी केली असता ते बनावट निघाले. याबाबत सुधीर यांनी संशयितांकडे चौकशी केली. परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच सुधीर यांनी त्यांच्याकडे पैसे परत देण्याची मागणी केली. परंतु त्यांनी टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने सुधीर खराडे यांनी तिघांविरुद्ध तक्रार दिली आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.