

आटपाडी (सांगली), पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात मोदीच्या नावावर ज्यांनी मते घेतली, त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी आपले सर्व गहाण ठेवले आहे. आता राज्यात पवार-ठाकरे यांचे माफिया राज्य आहे, हे वसुली सरकार आम्ही लवकरच उखडून टाकू, असा इशारा माजी खा. किरीट सोमय्या यांनी दिला.
आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामांच्या प्रारंभप्रसंगी ते बनपुरी येथे बोलत होते. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. गोपीचंद पडळकर, आ. सदाभाऊ खोत, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे उपस्थित होते.
सोमय्या म्हणाले, मोदी आणि फडणवीसांच्या नावावर मते मागून निवडून आलेल्या नेत्यांनी खुर्चीसाठी इमान विकले. मोदी सरकारने नदीजोड प्रकल्प राबविला आणि शेतीला पाणी दिले. फडणवीसांनी त्यांच्या काळात राज्यात हेच काम केले. ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा फडणवीस सरकार आणले पाहिजे.
ते पुढे म्हणाले, सध्या वीज आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकर्यांकडे राज्य सरकारचे लक्ष नाही. केंद्रातील मोदी सरकारने इंधन दर कमी करण्यासाठी मोठी कर कपात केली. राज्य सरकारने केवळ दीड रुपयांचा कर कमी केला. राज्य सरकारला आता किमान 15 रुपयांचा कर कमी करावाच लागेल.
सोमय्या पुढे म्हणाले, राज्य सरकारचा रोज एक घोटाळा बाहेर येतोय. कशाचा कशाला मेळ नाही.राज्यात आता पवार – ठाकरे यांचे माफिया आणि वसुली सरकार आहे. या वसुली सरकारपासून राज्याला मुक्त करण्याचा आम्ही विडा उचलला आहे. तो पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला.
हेही वाचा