सांगलीत कबड्डीपटूची निर्घृण हत्या, डोक्यात, मानेत दोन कोयते अडकले
सांगली : शहरातील जामवाडी परिसरातील मरगुबाई मंदिरासमोर पाच हल्लेखोरांनी धारदार कोयत्याने सपासप वार करीत कबड्डीपटू तरुणाचा निर्घृण खून केला. भरवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकाराने शहरात खळबळ उडाली. अनिकेत तुकाराम हिप्परकर (वय 22, रा. जामवाडी, सांगली) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी पाचही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून हा खून केला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
याबाबत माहिती अशी की, अनिकेत हा जामवाडीत आजी, आत्या व भावासोबत राहत होता. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. तो महाविद्यालयात शिकत होता. तो कबड्डीपटू होता. त्याने यापूर्वी जिल्हा संघातून कबड्डी स्पर्धा खेळली होती. काही दिवसांपूर्वी त्याचा कबड्डी खेळणार्या मित्रांसोबत वाद झाला होता. या वादातून संशयित व अनिकेत यांच्यात वारंवार खटके उडत होते. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तो जीमला जाण्यासाठी घराबाहेर पडला. घरापासून चालत काही अंतरावर मरगुबाई मंदिराजवळ तो आला असता, तेथे दबा धरून बसलेल्या संशयितांनी त्याच्यावर कोयत्यांनी हल्ला चढविला.
हल्लेखोरांकडे दोन धारदार कोयते होते. त्याला प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही. हल्लेखोरांनी कोयत्यांनी त्याच्यावर सपासप वार केले. त्याच्या डोक्यात पाच, तर पाठीवर सहा वार केले. डोक्यात आणि मानेत खोलवर वार गेल्याने दोन्ही कोयते तेथेच अडकलेे. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच हल्लेखोर पळाले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.
उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सांगली शहरचे संजय मोरे यांच्यासह पथकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेहाशेजारी त्याचा मोेबाईल, व्यायामाची बॅग, चप्पल पडली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठविला.
श्वानपथकाकडून माग
पोलिसांनी घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले होते. श्वान तेजा याने जामवाडी ते कर्नाळ रस्त्यापर्यंत माग काढला. हल्ल्यानंतर हल्लेखोर कर्नाळ रस्त्याकडे पळाल्याचे निष्पन्न होताच पोलिसांच्या पथकांनी तातडीने शोधमोहीम राबविली.
संशयितांची नावे निष्पन्न
खुनाच्या घटनेनंतर शहर पोलिस व एलसीबीच्या पथकाने हल्लेखोरांची नावे निष्पन्न करून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली. हल्ल्यातील पाचहीजणांना रात्री ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले.
मित्रांनीच केला घात
अनिकेत हा एका मंडळाकडून कबड्डी खेळत होता. संशयित पाच हल्लेखोरही कबड्डी खेळण्यासाठी येत होते. त्यातून त्यांची ओळख होऊन ते मित्र बनले होते. काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणातून अनिकेत आणि संशयितांमध्ये वाद झाला. हा वाद मिटविण्याचा प्रयत्नही अनिकेतने केला होता. अखेर मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयितांनी त्याचा निर्घृण खून केल्याची चर्चा जामवाडी परिसरात होती.