बिलावरून झालेल्या वादातून बारमधील कर्मचार्यांनी तडीपार गुंडाचा डोक्यात हातोडा घालून खून केला. ही घटना सिंहगड रस्ता परिसरातील वीर बाजी पासलकर (वडगाव) पुलाजवळील क्लासिक बारसमोर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. हनुमंत ऊर्फ अमोल ऊर्फ गोट्या दत्तात्रय शेजवळ (वय 34, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता, पुणे) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे.
याप्रकरणी हनुमंतचा भाऊ श्रीकांत दत्तात्रय शेजवळ (वय 31) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॉटेल मॅनेजर मुरकुटे, गणेश ऊर्फ काक्या कुलकर्णी व विप्लब सरकार या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या हाणामारीत कुलकर्णीदेखील गंभीर जखमी झाला आहे. अशा घटनांमुळे मात्र, गुन्हेगारांच्या मनात पोलिसांची भीती नसल्याचेही दिसत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हनुमंत ऊर्फ गोट्या हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, त्याला गेल्याच महिन्यात (दि. 27 जुलै 2024) रोजी सिंहगड रोड पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपार केलेले असतानादेखील तो वडगाव पुलाच्या परिसरात आलेला होता. मध्यरात्री तो येथील हॉटेल क्लासिक गार्डन येथे दारू पिण्यास बसला होता. दरम्यान दारू पिल्यानंतर मॅनेजर मुरकुटे याच्यासोबत वादावादी झाली. वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. तेव्हा मुरकुटे तसेच कॅशियर यांच्यासोबत हनुमंत याने वाद घातला. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, वाद वाढतच गेला. त्याने आत बिलावरून दोघांना मारहाण देखील केली.
दरम्यान, हनुमंत ऊर्फ गोट्या याला बारच्या बाहेर आणण्यात आले. हॉटेल मालकाने कुलकर्णी याला बोलावून घेतले. पूर्वी कुलकर्णी या हॉटेलबाहेर स्टॉल लावत होता. हनुमंत याने कुलकर्णी याला देखील मारहाण केली. तसेच, त्याच्या डोक्यात घाव घातला. त्यात कुलकर्णी गंभीररीत्या जखमी झाला. तो रक्ताने माखला होता. त्यातून चिडलेल्या गणेश कुलकर्णी याने पंक्चरच्या दुकानातील लोखंडी हातोडा घेत हनुमंत ऊर्फ गोट्या याच्या डोक्यात घातला. डोक्यात घाव बसल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी पळ काढला. मात्र, हा वाद रस्त्यावरच सुरू असल्याने तेथून जाणार्या एका नागरिकाने चौकात गस्त घालणारे उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांना घटनेची माहिती दिली. भांडवलकर यांनी तत्काळ चार कर्मचार्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले व इतर पळत असल्याचे दिसले. पोलिसांनी दोघांना पाठलाग करून पकडले. तर, या दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, गोट्या याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेत आरोपी गणेश कुलकर्णी हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्या डोक्यात मार लागला असून, त्याला 17 टाके पडले आहेत. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तपास पोलिस करत आहेत.
हनुमंत ऊर्फ गोट्या शेजवळ याचा डोक्यात हातोडा घालून खून करण्यात आला आहे. दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यातील एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हनुमंत याला शहरातून तडीपार करण्यात आले होते.
- आनंदराव खोबरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिंहगड रोड पोलिस ठाणे