

इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा : वाळवा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ता मिळवण्याठी पॅनेल प्रमुखामध्ये चुरस आहे. मतदारांना प्रलोभने दाखविली जात आहेत. गावोगाव जेवणावळी सुरु आहेत. तर दुसऱ्या बाजूला तालुक्यातील काही गावांमध्ये निवडणुकीतील विजयासाठी करणी, भानामती असे अंधश्रद्धेचे प्रकार सुरू झाले आहेत.
वाळवा तालुक्यातील ८१ गावांमध्ये निवडणुका होत आहेत. सर्वसाधारण पुरुष, सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी चुरस आहे. निवडणुकीत पॅनेलप्रमुख, उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काही गावातील पॅनेलप्रमुख, उमेदवार यांचा भोंदू, देवरशांकडे ये-जा वाढली आहे. निवडणुकीतील विजयासाठी देवरशांकडून दोरे, गंडे दिले जात आहेत. कणेगावसह परिसरातील गावामध्ये परडी, उतारे,दोरा गंडे, काळ्या बाहुल्या, लिंबू, करणी असे अंधश्रद्धेचे प्रकार समोर आले आहेत. वाळवा तालुका पुरोगामी विचार पुढे नेत असताना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अंधश्रद्धेचे प्रकार समोर येवू लागले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तर एका बाजूला निवडणुकीच्या निमित्ताने भोंदूबाबा, देवरशी यांची आर्थिक चलती सुरू आहे.