

जत : अवैधपणे काळा बाजारासाठी तांदळाची वाहतूक करणार्या दोघांना अटक करून तब्बल 35 लाख 3 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पुरवठा निरीक्षक श्रीकांत चंद्रकांत चोथे यांनी उमदी पोलिसात दिली आहे.
उमदी पोलिसांनी लवंगा (ता. जत) येथे दि. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. याप्रकरणी चालक तिपन्ना हेबालेवा मदार (वय 39) व यलप्पा बालप्पा देसाई (दोघेही रा. चन्नापूर, ता. रामदुर्ग. जि. बेळगाव) या दोघांविरुद्ध उमदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक तिपन्ना मदार यांस पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, उमदी पोलिस ठाण्याचे हवालदार नामदेव काळेल यांना लवंगा येथे विजापूर-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकमधून (केए 36 सी 5852) रेशनिंगचा तांदूळ अवैधपणे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने लवंगा गावाजवळ सापळा रचून ट्रक ताब्यात घेतला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये 33 टन तांदूळ आढळून आला. यात शासकीय रेशनिंगवरील तांदूळ पोत्यांचा समावेश आहे, तर काही तांदूळ खुल्या बाजारातील आहे. उमदी पोलिसांच्या पथकाने याबाबतची माहिती जतचे पुरवठा निरीक्षक श्रीकांत चोथे यांना दिली. कारवाईत 25 लाख रुपये किमतीचा ट्रक आणि 10 लाख 3 हजार 200 रुपये किमतीचा 33 टन तांदूळ, असा 35 लाख 3 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक निरीक्षक संदीप कांबळे, उपनिरीक्षक सिद्धेश्वर गायकवाड व पथकाने केली. अधिक तपास उपनिरीक्षक सिद्धेश्वर गायकवाड करीत आहेत.
या प्रकरणात तांदूळ नेमका कुठून आला? त्यासाठी कोणत्या परवान्याचा वापर करण्यात आला? सीमा भागातून वाहतूक कशी झाली? सदरचा काळाबाजार व विनापरवाना वाहतूक होत असलेला तांदूळ कर्नाटकाचा की महाराष्ट्रातील आहे? याचा सखोल व काटेकोर तपास होणे अत्यंत आवश्यक आहे. रेशनिंगच्या पोत्यांत भरलेला तांदूळ शासकीय कोट्यातील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे.