

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथे पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल शहाजी शिंदे यांच्यावर गावातीलच आठ जणांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. ही घटना 5 जानेवारीरोजी रात्री घडली. या हल्ल्याने कवठेमहांकाळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेची कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. 5 जानेवारीरोजी रात्री फिर्यादी अनिल शिंदे हे घरी झोपले होते. त्यावेळी संशयितांनी त्यांच्या घराची बेल वाजवली. अनिल शिंदे हे बाहेर आले. त्यावेळी संशयित शिवम सुनील शिंदे व अक्षय बाळासाहेब दबडे यांनी शिंदे यांना घरातून बाहेर बोलावले. शिंदे यांनी सोडविलेल्या भांडणाचा राग मनात धरुन शिवम याने कोयत्याने शिंदे यांच्या दोन्ही हातावर वार केला. शिंदे यांनी कोयत्याचे वार चुकविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी त्यांचा भाचा मदतीसाठी आल्याने हल्लेखोर पळाले. शिंदे यांच्या दोन्ही हातांवर कोयत्याने गंभीर वार झाले आहेत. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
संशयित अमोल बबन खाडे, अविनाश बबन खाडे, अक्षय बाळासाहेब दबडे, अविनाश बाळासाहेब दबडे, अक्षय दादासाहेब जाधव, निलेश अनिल जाधव, नासीर जावेद मणेर (सर्व रा. घाटनांद्रे) यांनी अनिल शिंदे यांना बेकायदेशीर जमाव जमवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळी करून शिंदे यांची दुचाकी, मोटार व घराचा दरवाजा मोडून नुकसान केले आहे. अनिल शिंदे यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे. शिंदे यांनी आठ संशयितांविरुद्ध फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवशरण करीत आहेत.