

सांगली : भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हर्षवर्धन विकास दळवी असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना 11 डिसेंबर रोजी गायत्रीनगर, बायपाय रस्ता, घाटगे हॉस्पिटलच्या मागे घडली होती.
हर्षवर्धन व त्याचे वडील विकास दळवी हे घरी होते. सायंकाळी हर्षवर्धन दारात खेळत होता. दरवाजासमोरच असलेल्या कुत्र्याने अचानक मुलगा हर्षवर्धन याच्यावर हल्ला केला. त्यामध्ये हर्षवर्धनच्या डोक्याला आणि डोळ्याजवळ कुत्र्याने जोराचा चावा घेतला. त्यामध्ये त्याच्या कवटीजवळ जखम झाली होती. घाबरलेल्या वडिलांनी कुत्र्याच्या तावडीतून मुलाला सोडवले. गंभीर जखमी असल्यामुळे त्याला तातडीने सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दोन दिवसांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याला इंजेक्शनचा डोस देण्यात आला होता. पण दोन दिवसांनी त्याला ताप आला.
दुसऱ्या दिवशी त्याला उलट्या होऊ लागल्या. पुन्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना सोमवारी (दि. 29) त्याचा मृत्यू झाला. हर्षवर्धन याचे वडील खिडक्या तयार करण्याचे काम करतात. शहरात भटक्या कुत्र्यांचे लहान बालकांवर हल्ले वाढले असून, प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी कुत्री झुंडी करून थांबलेली असतात. या प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असून, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.