सांगली : एसटीतील प्रवाशांना लुटणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश

सांगली : एसटीतील प्रवाशांना लुटणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश

विटा: पुढारी वृत्तसेवा : एसटी बसमधील प्रवाशांना लुटणारी आंतरराज्य महिलांच्या टोळीचा विटा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी आर. ईश्वरी (वय २८) आणि एम.दिपा (वय २२, रा. दोघीही रा. टूमकूर, कर्नाटक, सध्या रा. तासवडे, ता. कराड) या महिलांना अटक केली. त्यांच्याकडून दोन गुन्ह्यातील तब्बल ९ लाख ५१ हजार ३५० रुपये किंमतीचे १७९.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या महिलांसोबत आणखी काही महिला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यात २६ नोव्हेंबर रोजी विटा पोलीस ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल झाले होते. या दोन्ही वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन प्रवाशी महिलांना अज्ञात चोरट्यांनी लुटले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील किणी वाठार (ता.हातकणंगले) येथील नीता सोमनाथ निकम (वय ३४) या सकाळी ११.१५ वाजण्याच्या दरम्यान कराड बसस्थानकावरून गुहागर ते तुळजापूर एसटी मधून प्रवास करीत होत्या. यावेळी नीता निकम यांच्या बॅगेतील सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती.

याच दिवशी गुहागर ते तुळजापूर एसटी बसमधून सोलापूर जिल्ह्यातील पिलीव (ता. माळशिरस) येथील बायडा अनिल पाटणकर (वय ७४) ही वृद्ध महिला प्रवास करत होती. यावेळी या महिलेची दागिन्यांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती.

दरम्यान, विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस अमरसिंह सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने ७ डिसेंबररोजी काही महिलांना विटा बस स्थानकावर संशयितरित्या वावरताना ताब्यात घेतले होते. या महिलांनी चोरलेले सोन्याचे दागिने तासवडे टोलनाका (ता. कराड) येथील राहत असलेल्या भाड्याच्या घरात ठेवल्याची कबुली दिली. त्यावरून त्यांच्याकडून ५ तोळे ५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, ५ तोळेचा सोन्याचा हार, १ तोळे वजनाचे झुमके व टॉप्स, ७ ग्रॅमच्या लहान मुलीच्या दोन बांगडया, ६ ग्रॅमची गणपतीचे पेंडन्ट असलेली सोनसाखळी आणि सोन्याच्या ३ अंगठ्या असा एकूण ९ लाख ५१ हजार ३५० किंमतीचे १७९.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे, अमरसिंह सूर्यवंशी, सुरेश भोसले, हणमंत लोहार,,मनिषा खाडे, सुषमा देसाई, जयश्री होळकर यांच्या पथकाने केली.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news