Dhairyasheel Mane : सीमाभागातील मराठी माणूस दहशतीखाली; खासदार धैर्यशील मानेंची संसदेत माहिती | पुढारी

Dhairyasheel Mane : सीमाभागातील मराठी माणूस दहशतीखाली; खासदार धैर्यशील मानेंची संसदेत माहिती

इचलकरंजी: पुढारी वृत्तसेवा : सीमाभागातील मराठी माणूस कर्नाटक सरकारच्या दडपशाहीमुळे दहशतीखाली आहे. येथील वातावरण भयमुक्त होण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची तातडीने बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी समन्वय समितीचे अध्यक्ष तथा खासदार धैर्यशील माने  (Dhairyasheel Mane) यांनी आज (दि.९) संसदेत केली.

(Dhairyasheel Mane ) सीमाभागात तणावाचे वातावरण आहे. कन्नड रक्षण वेदिका समितीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करुन मराठी माणसांवर दहशत माजवली. गेल्या चार दिवसांपासून कर्नाटकात सुरू असलेल्या या प्रकरणाचे पडसाद शुक्रवारी संसदेत उमटले. खासदार माने यांनी सीमाभागात सुरू असलेल्या अन्यायाला सभागृहात वाचा फोडली.

ते म्हणाले, सीमाभागात कर्नाटक सरकार पुरस्कृत मराठी माणसांवर दहशत सुरू आहे. येथील जनता भीतीच्या छायेखाली आहे. एकाबाजूला सीमाप्रश्नी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला असताना कर्नाटकात दहशत माजवून वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे प्रकार थांबवणे आवश्यक आहे. दोन्ही राज्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण असले पाहिजे. येथील मराठी माणसाला दिलासा देणे आवश्यक आहे. आता केंद्र सरकारनेच दोन्ही राज्यांत समन्वय साधून वातावरण अधिक बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी खासदार माने यांनी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button