Farmers Protest : किमान हमीभावाला कायदेशीर गॅरंटी देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे जंतर मंतरवर आंदोलन | पुढारी

Farmers Protest : किमान हमीभावाला कायदेशीर गॅरंटी देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे जंतर मंतरवर आंदोलन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : किमान हमीभावाला  (Farmers Protest) कायदेशीर गॅरंटी देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान काँग्रेसकडून शुक्रवारी (दि.९) देशाची राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करण्यात आले. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेल्यावर्षी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी असंख्य शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

अखिल भारतीय किसान काँग्रेस ही काँग्रेस पक्षाशी संबंधित संघटना आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे (Farmers Protest) सरकारने डोळेझाक केलेली आहे. गतवर्षी आंदोलन समाप्त करते वेळी जी आश्वासने देण्यात आली होती, त्या आश्वासनांचे पालन सरकारकडून झालेले नाही. ज्या शेतकऱ्यांना आंदोलनात प्राण गमवावे लागले, त्यांची यादीसुद्धा सरकारने जाहीर केलेली नाही, असे किसान काँग्रेसचे समन्वयक हरगोविंद सिंग यांनी सांगितले. गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात सरकारने संसदेत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले होते.

किमान हमी भाव देण्यासाठी सरकारकडे सुयोग्य कायदा नाही. सर्वप्रथम सरकारने हा कायदा केला पाहिजे. तसेच हमीभावाला कायदेशीर गॅरंटी दिली पाहिजे, असे सिंग यांनी नमूद केले. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात उत्तर प्रदेश, हरियाणा, ओडिशा, छत्तीसगड, बिहार आदी राज्यांतील शेतकरी प्रामुख्याने सामील झाले होते.


हेही वाचलंत का ? 

Back to top button