

कडेगाव: आशिया खंडातील सर्वात मोठी व दुष्काळी भागाला वरदान ठरणारी टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन अखेर आज (दि.२७) सकाळी सुरू झाले. त्यामुळे कडेगाव तालुक्यासह दुष्काळी खानापूर, आटपाडी आदी तालुक्यातील टेंभूच्या अवर्तनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे. तर योजनेचे आवर्तन सुरू झाल्याने 55 हजार हेक्टर लाभ क्षेत्रातील शेती पिकांना लाभ मिळणार आहे. दरम्यान या योजनेचे पाणी आज सकाळी कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर व हिंगणगाव बुद्रुक तलावात पोहोचले आहे. Tembhu Yojana
जिल्ह्यातील कडेगावसह खानापूर, आटपाडी आदी योजनेच्या लाभ क्षेत्रातील दुष्काळी तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन केंव्हा सुटणार याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. चालू वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी तालुक्यात तीव्र पाणी टंचाई भासत असून रब्बी पिके पाण्याअभावी कोमेजली आहेत. तर ऊस पिकांसह अन्य बागायत पिके देखील धोक्यात आली आहेत. त्यामुळे टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती. तर याबाबत माजी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रम सावंत यांनी विधानसभेत आवाज उठविला होता. Tembhu Yojana
दरम्यान, कृष्णा नदीचे पाणी अडवून टप्पा क्र 1 अ मध्ये सोडले आहे. टप्पा क्रमांक 1 अ मधून हे पाणी 61 मीटर इतक्या खड्या उंचीवर असलेल्या टप्पा क्र 1 ब मध्ये सोडण्यात आले आहे. यासाठी टप्पा क्र 1 अ मध्ये 1950 अश्वशक्तीचे एकूण 33 पंप बसवण्यात आले आहेत. यापैकी चार पंप सध्या सुरु करण्यात आले आहेत. टप्पा क्रमांक 1 ब मधून हे पाणी 85 मीटर उचलले जाऊन 6 महाकाय पाईपलाइनद्वारे योजनेचे पाणी खांबाळे बोगद्याच्या सुरवातीस वितरण हौदामध्ये टाकले गेले आहे. खांबाळे बोगद्याच्या मुखाशी टाकलेले पाणी खंबाळे बोगदा पास करून जोड कालव्याद्वारे कडेगाव तालुक्यामध्ये प्रवेश करीत येथील मुख्य कालव्याद्वारे शिवाजीनगर तलावात असलेल्या टप्पा क्र 2 मध्ये पोहोचले गेले आहे.
याच बरोबर हिंगणगाव बुद्रुक तलावात पाणी सोडण्यात आले आहे. याठिकाणी चार ते पाच दिवस हे पाणी सुरू राहणार आहे. त्यानंतर मुख्य कालव्यातून हे पाणी पुढे थेट माहुली (ता खानापूर )येथील टप्पा क्रमांक 3 च्या तलावात जाते. पुढे हे पाणी माहुली पंपगृहापासून पुढे प्रवास करीत हे पाणी खानापूर, आटपाडी आणि सांगोला तालुक्यात दिले जाणार आहे. योजनेच्या टप्पा क्र 1 अ ,1 ब , 2 ,3 , 4 , 5 व विसापूर पुणदी आणि विसापूर अशा एकूण सहा टप्प्यातून पाच बोगदे पार करीत 200 किलोमीटर अंतराचा दीर्घ प्रवास करीत टेंभुचे पाणी सद्यस्थितीत तब्बल 55 हजार हेक्टर लाभक्षेत्राची तहान भागविणार आहे.
हेही वाचा