सांगली : स्वतः च्या लोकप्रियतेसाठी अजित पवारांवर केलेली टीका खपवून घेणार नाही : पाटील | पुढारी

सांगली : स्वतः च्या लोकप्रियतेसाठी अजित पवारांवर केलेली टीका खपवून घेणार नाही : पाटील

विटा; पुढारी वृत्तसेवा : स्वतः च्या लोकप्रियतेसाठी अजित पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली जाते. अशा प्रकारची टीका यापुढे खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना दिला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय घेताना अजित पवार यांच्या हाताला लकवा भरला आहे का? अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. यावर आता अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, आजपर्यंत ज्या-ज्या वेळी अजित पवार सत्तेत आहेत, त्यावेळी त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शेती संदर्भात किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक प्रलंबित प्रश्न आणि योजना कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. सहकारी साखर कारखाने, खासगी कारखान्यांतून एफआरपी पेक्षा जास्त ऊस दर देण्यामध्ये नेहमीच अजित पवार यांची भूमिका चांगली आणि सकारात्मक राहिलेली आहे. या सगळ्याचा विचार करून सदाभाऊ खोत यांनी बोलाव, असे पाटील यांनी म्हटले आहे.

तुम्ही सुद्धा माजी मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे. सरकारमध्ये काम करत असताना सगळ्यांचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. याचा अर्थ हाताला लकवा भरला किंवा आम्ही काय करू शकत नाही, असं नाही. त्यामुळे अजित पवारांवर बोलण तुमच्यासारख्यांना शोभत नाही. इथून पुढे बोलताना दक्षता बाळगावी अशी विनंती करतो. केवळ लोकांना बरे वाटावे, कुठेतरी आपले अस्तित्व दाखवावे आणि त्यातून स्वतःला सवंग लोकप्रियता मिळावी यासाठी असे बालिशपणाने बोलणे आपल्यासारख्या माजी मंत्र्यांना शोभत नाही. यापुढे अजितदादांबद्दल अशा प्रकारची वक्तव्य कराल तर त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

Back to top button