सांगली : पतीच्या अनधिकृत बांधकामामुळे खानापूरच्या नगरसेविकेचे पद रद्द | पुढारी

सांगली : पतीच्या अनधिकृत बांधकामामुळे खानापूरच्या नगरसेविकेचे पद रद्द

विटा; पुढारी वृत्तसेवा : पतीने केलेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी खानापूर येथील उमा रामचंद्र देसाई या नगरसेविकेला आपले पद गमवावे लागले आहे. याबाबत मंगळवारी (दि. २६) जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी निकाल दिला.

खानापूर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दोन वर्षांपूर्वीच झाली. त्यात वॉर्ड क्र. १७ मधून उमा देसाई या विरोधी गटातून निवडून आल्या. त्यांचे पती रामचंद्र यांनी वॉर्ड क्रमांक १३ मध्ये नगरपंचायतीचा – परवाना न घेता अनधिकृतपणे बांधकाम – सुरू केले. राज्य शासनाच्या नगरसेवक अपात्रता नियमांतर्गत हा प्रकार येतो, अशी लेखी तक्रार खंडू राजाराम मंडले यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

राज्य शासनाच्या महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ४४ नुसार नगरसेवक अपात्र कायद्यानुसार संबंधित नगरसेवकाचा पती किंवा पत्नी यांनी अनधिकृत बांधकाम केले असेल, तर त्यास अपात्र ठरविले जाते. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पाच ते सहा वेळा सुनावणी घेतली गेली. अखेरीस मंगळवारी नगरसेविका देसाई यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी नगरसेविका उमा देसाई यांना राज्य शासनाकडे अपील करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. शिवाय नगरपंचायतीच्या नियमानुसार अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत, अशी माहिती नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सोनाली यादव यांनी दिली.

Back to top button