

विटा : बनावट चलन तयार करण्यासाठी बोगस साहित्य विकून फसवणूक करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीला आज शुक्रवारी विटा न्यायालयाने दोषी ठरवून आठ वर्षांची शिक्षा सुनावली. मार्क विल्यम ऊर्फ इसाई किपंनगेतीज मुथाय ऊर्फ अँथोनी ओयेमिना असे त्याचे नाव असून तो मूळ नामबिया देशाचा रहिवाशी आहे. त्याच्यावर तब्बल ८४ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होता आणि तो न्यायालयात सिद्ध झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, आठ वर्षां पूर्वी विट्यातील जय भवानी कन्स्ट्रक्शनमध्ये एके दिवशी भर दुपारी तीन जण आले. यातल्या एका नायजेरियन व्यक्तींने त्याचे नाव मार्क विल्यम असून त्यांनी आम्हाला तुमच्या कन्स्ट्रक्शनमध्ये गुंतवणूक करायची आहे असे या कंपनीतील सचिन बाळकृष्ण लोटके यांना सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन गुंतवणुक करण्यासाठी त्यांचेकडे असलेली २७ कोटींची अॅन्टी ब्रीज मनी म्हणजे ब्लॅक करन्सी युरो या विदेशी चलनात रूपांतरीत करायची आहे, आणि त्यानंतर भारतीय रूपयामध्ये बदलून तो पैसा गुंतवणूक करणार आहे असेही सांगितले.
मात्र सर्व प्रक्रियेसाठी २७ कोटीची ब्लॅक करन्सी अर्थात काळा पैसा वर द्यावा लागेल. त्यासाठी लीक्वीड ओरीजनल ५०० यूरो चलनाच्या (तात्काळ रोकड) १२० नोटा आणि त्या साठी आवश्यक असलेली ब्लॅक करन्सी (काळा पैसा) हा आम्हाला बेंगळुरू येथील ग्लोबल सिक्युरीटी ऑफीस येथून सोडवायचा आहे. असे सांगून जय भवानी कन्स्ट्रक्शन च्या सचिन लोटके आणि त्यांच्या मित्रांकडून डिसेंबर २०१७ ते ५ मे २०१८ या कालावधीत वेळोवेळी एकूण ८४ लाख ८० हजार इतकी रक्कम रोख स्वरूपात घेतली.
त्यानंतर ही ब्लॅक करन्सी (काळा पैसा) विदेशी युरोमध्ये रूपांतरीत करण्याची प्रक्रीया करीत असताना विल्यम आणि त्याच्या साथीदारांनी दिलेले काळे कागद, लिक्वीड, ५०० युरो चलनाच्या १२० नोटा व इतर साहित्य अशी त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे प्रक्रिया केली. मात्र या भानगडीत बोगस चलन तयार करण्यासाठी दिलेले दिलेले साहित्यच बनावट असल्याचे सचिन लोटके आणि त्यांच्या मित्रांना समजून आले. त्यानंतर लोटके आणि त्यांच्या मित्रांनी विल्यम यास वारंवार फोन करून संपर्क केला असता बनवाबनवीची उत्तरे देत राहिला अखेरीस १५ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांनी विटा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. त्यावेळी
मार्क विल्यम वर भारतीय दंड विधान कलम ४२०, ४१७,४८९ (ड), ४८९ (ई), ३४ विदेशी व्यक्ती अधिनियम ३,५,१४ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सहा य्यक पोलीस निरीक्षक एन.बी. सावंत यांनी केला. यातील संबंधित आरोपी मार्क विल्यम याच्यावर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. आज शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी आरोपी मार्क विल्यम ८ वर्षाची सक्तमजुरी शिक्षा आणि १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास २ महिन्याची साधी कैद, आणि कलम ४८९ ई अन्वये १०० रुपये दंड शिवाय दंड न भरल्यास १५ दिवसांची आणखी साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. दरम्यान विटा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्ह्यात तिसऱ्यांदा शिक्षा लागण्याच्या प्रकारामुळे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.