सांगली: वांगी येथे घराच्या दरवाजांना विजेचा करंट देऊन कुटुंबाला संपविण्याचा प्रयत्न

सांगली: वांगी येथे घराच्या दरवाजांना विजेचा करंट देऊन कुटुंबाला संपविण्याचा प्रयत्न

Published on

कडेगाव: पुढारी वृत्तसेवा: वांगी (ता.कडेगाव) येथील स्वातंत्र्यवीर शाहीर शंकरराव निकम यांचा मोठा मुलगा अशोक निकम यांच्या घरासमोर व मागील बाजूस दरवाजाला विजेच्या विद्युतवाहक तारेद्वारा ११ केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटुंब संपवण्याचा धक्कादायक प्रयत्न अज्ञाताकडून झाला. मात्र, देव तारी त्याला कोण मारी या युक्तीप्रमाणे हे कुटुंब सुखरूप बचावले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, अशोक निकम हे वांगी गावाच्या उत्तरेस बिरोबाचीवाडी रोड लगत असलेल्या घरात कुटुंबासह राहतात. मंगळवारी (दि.३) अशोक निकम आपली पत्नी व दोन मुलांसह जेवण करून झोपले. दरम्यान, रात्री १ वाजता अचानक घरासमोर विजेचा मोठा जाळ झाला व घरातील लाईट गेली. मात्र, घराजवळ ट्रांसफार्मर असल्यामुळे त्यांनी ट्रांसफार्मरमध्ये जाळ झाला असेल, असे समजून दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्यांदा वीज आल्यानंतर घरालगत जाळ झाल्यामुळे त्यांनी घरातील सर्वांना जागे केले. व बॅटरीच्या सहायाने बाहेर पाहिल्यास त्यांना विजेच्या विद्युत वाहक तारा घराच्या दरवाजाजवळ अडकवलेली दिसून आली. हे पाहताच ते घाबरले.

त्यानंतर त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता घरासमोर असलेल्या ट्रांसफार्मरवरील ११ केव्ही तारेतून घराच्या पुढील व मागील दरवाजास विद्युत वाहक तारेने करंट दिल्याचे दिसून आले. तर करंट दिलेली तार काढून घेऊन जाण्यासाठी त्या तारेला एक हजार फूट लांब दोरी बांधून ती बाजूला असलेल्या उसातून जोडून ठेवली असल्याचे दिसून आले. घरातील लोक बाहेर आल्यावर अज्ञात काही जण ती दोरी ओढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना त्यामध्ये अपयश आले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळापासून पलायन केले. या घटनेबाबत अद्याप पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही.

हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news