

मिरज : महापालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपचे उमेदवार अल्लाबक्ष गडेकरी यांनी घेतलेली हरकत रात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली. त्यामुळे त्यांचा अर्ज वैध ठरला. रात्रीपर्यंत महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मिरजेतील एकूण सहा प्रभागांमधून 361 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. येथील महानगरपालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयामध्ये व बालगंधर्व नाट्य मंदिरामध्ये उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यावेळी प्रभाग क्रमांक चार, सहा व सात या ठिकाणच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विरोधात हरकती घेण्यात आल्या. प्रभाग क्रमांक चारमधील राष्ट्रवादीच्या उमेदवार सिद्धी पिसे यांच्याविरोधात भाजपच्या उमेदवार अपर्णा शेटे यांनी हरकत घेतली. पिसे यांचा ओबीसी जातीचा दाखला हा कर्नाटक राज्यातील असल्याचे शेटे यांचे म्हणणे होते. मात्र पिसे यांचा दाखला हा महाराष्ट्र राज्यातील असल्याचे स्पष्ट करीत त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. प्रभाग क्रमांक सातमधील महिला काँग्रेस उमेदवाराविरुद्ध देखील हरकत दाखल झाली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचा अर्ज वैध ठरविला.
यावेळी प्रभाग क्रमांक सहामधील अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार मैनुद्दीन बागवान यांच्याविषयी दोघांनी आक्षेप घेतला. याच प्रभागातील तन्वीर बागवान या उमेदवाराने हरकत घेतली होती. मैनुद्दीन यांच्या पत्नी कौसर यांच्या मालकीच्या मिळकतीची थकबाकी आहे. ती थकबाकी त्यांनी भरली नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवावा, अशी त्यांची मागणी होती. मात्र या अर्जानंतर तन्वीर यांनी म्हणणे मांडले नाही. त्यानंतर याच प्रभागातील शाहिस्ता पिरजादे या उमेदवाराने तक्रारी अर्ज दिला. तन्वीर यांनी दिलेल्या अर्जावर सविस्तर सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मैनुद्दीन बागवान यांच्याविरोधात दुसरी तक्रार भाजपचे उमेदवार अल्लाबक्ष गडेकरी यांनी दाखल केली. बागवान यांनी महापालिकेच्या वाहनाचा गैरवापर केला होता. तत्कालीन उपायुक्त वैभव साबळे यांनी त्यांना दि. 26 डिसेंबर 2024 रोजी नोटीस दिली होती. बागवान यांनी मनपा गाडीचा गैरवापर केला होता. त्यासाठी दंड का आकारू नये, अशी त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. या नोटिसीचा उल्लेख बागवान यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केला नव्हता. निवडणूक आयोगाची बागवान यांनी फसवणूक केली आहे, त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवून उमेदवारी रद्द करावी, असे तक्रारी अर्जात गडेकरी यांनी म्हटले होते. या तक्रारी अर्जानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्हीकडील बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे अभिप्रायासाठी अहवाल पाठवला. रात्रीपर्यंत याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता.