

सांगली ः सांगली, मिरज व कुपवाड महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महाविकास आघाडीत आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याबाबत रविवारी रात्री उशिरापर्यंत खलबते सुरूच होती. या तीन पक्षांची मिळून नवीन आघाडी स्थापन करायची, की आघाडीने ‘घड्याळा’सोबत समझोता करून मांडणी करायची, हा फैसला बाकी असल्याचे समजते.
आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, राष्ट्रवादी अध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांमध्ये या विषयावर बैठकांचा फेर सुरू आहे. रविवारी दिवसभर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बजाज यांच्या निवासस्थानी प्रमुख नेत्यांच्या बैठका झाल्या. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी हेवेदावे आणि गावाकडे वाद बाजूला ठेवून या बैठकीत सहभाग घेतल्याने आघाडीबाबतच्या चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे सांगण्यात आले.
महाआघाडीत काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे ‘मेरिट’वर उमेदवारी देणे शक्य आहे, याचा ठोकताळा समोर ठेवला आहे. त्यासमोर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादी आहे. कोणत्या ठिकाणी कोण फिट बसेल, याचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या चर्चेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सहभाग अद्याप कायम आहे. त्यांनी जागांची यादी दिलेली आहे. मात्र, आधी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीवर मोहोर लागेल आणि त्यात शिवसेनेला कसे सामावून घ्यायचे, याचा निर्णय होईल, असे सांगण्यात आले.