

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी यादी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रखडली. निश्चित झालेल्या उमेदवारांना पक्षातर्फे अर्ज भरण्यास सांगितले होते. त्यानुसार काहींनी सोमवारी, तर काहींनी मंगळवारी अर्ज दाखल केले. या सर्व उमेदवारांना पक्षाचे एबी फॉर्म मंगळवार, 30 रोजी मिळाले. अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यानंतर भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपतर्फे 21 माजी नगरसेवक पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत, तर अनेक माजी नगरसेवकांचा पत्ता कट झाला आहे. उमेदवारी यादीत दोन आमदारांसह स्थानिक नेत्यांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे. उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी बंडाचा झेंडा रोवत अर्ज दाखल केले आहेत.
भाजपकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी होती. 78 जागांसाठी 529 इच्छुकांनी उमेदवारीसाठी भाजपकडे मुलाखत दिली होती. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना भाजप नेत्यांची कसरत झाली. पक्षातील गट-तट, अंतर्गत कलह यातून आपल्याच समर्थकाला, आपल्याच कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, यासाठी नेतेमंडळी आग्रही राहिली. त्यामुळे उमेदवारी यादीस विलंब झाला. शिवाय इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी यादी जाहीर करताच नाराजीचे पेव फुटणार आणि विरोधी पक्षांकडून नाराजांना आपल्या छावणीत घेण्याचे प्रयत्न होणार, हे निश्चित होते. त्यामुळेही भाजपने उमेदवारी यादी जाहीर करणे टाळले.
भाजपने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाआधी एक दिवस निश्चित झालेल्या उमेदवारांना उमेदवारी दाखल करण्याचे निरोप दिले. त्यामुळे सोमवार, दि. 29 रोजीपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरूवात झाली.काहींनी सोमवारी, तर काहींनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवार, दि. 30 रोजी उमेदवारांना एबी फॉर्म दिले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर भाजपने आपल्या सर्व 78 उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान, या यादीत 21 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. काही माजी नगरसेवक तसेच काही निष्ठावंतांना भाजपची उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे बंडखोरीही झाली. काहींनी अपक्ष तर काहींनी शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपच्या उमेदवारी यादीमध्ये आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष तथा निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दि. 2 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत आहे.