

सांगली ः शाळेतील प्रत्यक्ष हजर विद्यार्थ्यांची संख्या, गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या व त्यांचे प्रमाण नेमके कळविण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. पहिली ते दहावीच्या राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचीही ऑनलाईन हजेरी ऑनलाईन करण्यात येणार आहे. या हजेरीची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने उलट तपासणी होणार आहे.
विद्या समीक्षा केंद्र (व्हीएसके) या ऑनलाईन पोर्टलद्वारे ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्यातील काही शाळांमध्ये ही व्यवस्था आधीच अंमलात आणली आहे. उर्वरित शाळांमध्ये ती लवकरच सुरू होणार आहे. दिवसभरात एकदाच हजेरी घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या हजेरीची जबाबदारी वर्गशिक्षकांवर आहे. वर्गशिक्षक मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून सहजपणे ही हजेरी नोंदवू शकणार आहेत. यामुळे शाळांमधील हजेरी व्यवस्था अधिक पारदर्शक व अचूक होणार आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचीही ऑनलाईन हजेरी घेण्यात येणार आहे. याची जबाबदारी मुख्याध्यापकांकडे असणार आहे. या हजेरीबाबत विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून उलटतपासणी केली जाणार आहे.