

सोलापूर : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर दोन येथील अवधूत विद्यालय खासगी अनुदानित माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षण विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शाळेच्या वेळेत बदल केल्याचा दावा शिक्षक भारती संघटनेने केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शासन निर्णयानुसार, माध्यमिक शाळांचे नियमित वेळापत्रक सकाळी साडेदहा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत आहे. मात्र, संबंधित मुख्याध्यापकाने शुक्रवारी दि. 4 जुलैला शाळा सकाळी साडेसात वाजता सुरू करून दहा वाजता शाळा बंद केली. यामुळे कोणतेही अध्यापन न होता विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिवस वाया गेला आहे. याविषयी शिक्षक भारती संघटनेंनी संबंधित मुख्याध्यापकाविरोधात माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे ई-मेलद्वारे लेखी तक्रार दाखल केली आहे.
मुख्याध्यापक उन्हाळी सुट्टीदरम्यान शाळेसाठी बंधनकारक असलेले काम टाळून वारंवार गैरहजर राहत आहेत. इतकेच नव्हे, तर हजेरीपत्रकात बोगस सह्या केल्या जात असल्याचा संशय शिक्षक भारती संघटनेंनी व्यक्त केला आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून सखोल चौकशी करावी आणि दोषींवर शिस्तभंगात्मक कारवाई करावी, अशी मागणी संघटनेकडून होत आहे.